Monday, February 15, 2021

एक होऊ घातलेला कुक :)

 बरेचदा आपण बोलण्यात ऐकतो - पुरुषांनी मनावर घेतलं तर ते बायकांपेक्षा उत्तम स्वयंपाक करतात. हॉटेलमध्ये पण बहुतांशी शेफ हे पुरुषचं असतात. अमेयला मनापासूनच जेवण बनवायला आवडत नाही. लग्न झाल्यावर मला वाटायचं दोघांनी मिळून जेवण बनवावं किंवा थोडं का होईना एकत्र काहीतरी करावं. पण तसं झालं नाही आणि मी माझ्या मनाची समजून घातली. आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिसावाला मला ऑफिसला जावं लागलं. घरी आल्यावर पहाते तर Surprise - त्याने पहिल्यांदाच गाजर हलवा केला होता. खूप छान वाटलं. 


त्यानंतर जेंव्हा मला दिवस गेले तेंव्हा मला वाटलं चला आता आपल्याला त्याच्या हातचं काहीतरी खायला मिळेल. पण त्याच्या सुदैवाने मला कसलाच त्रास झाला नाही त्यामुळे त्याने काही करायचा प्रश्नच आला नाही. पण त्या दरम्यान एक दिवस त्याने पिठलं केलं होत ते अफलातून झालं होत, अजूनही माझ्या जीभेवर ती चव रेंगाळते आहे. मला आजतागायत तसं पिठलं करायला जमलेलं नाही.

मध्यंतरी पोहे, उप्पीट, खिचडी, ऑम्लेट असं चुटुरफुटूर खायला मिळतं होत पण आज पहिल्यांदाच करून पण अंडा करी चविष्ट झाली होती. पोट आणि मन तृप्त झालं.  माझ्या आता लक्षात आलय कि हाताला चव असते म्हणतात ती हीच, कारण प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा करून पण तो इतका छान होतो (किमान मला तरी तसा वाटतो). अमेय म्हणतो मला डे'ज सेलेब्रेट करायला आवडत नाहीत - 'मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा' ... पण आजच्या मुहूर्ताला धरून माझा तरी Valentine छान साजरा झाला. मला मिळालं गिफ्ट म्हणून एक उत्तम आयतं जेवण आणि एक होऊ घातलेला कुक :)