Thursday, April 23, 2015

बाली- मनमोहक नगरी

मित्र मैत्रिणींचे बालीचे फोटो पाहून मलाही कधी जाता येईल का असं कायम वाटत होत आणि अचानक तो योग जुळून आला. सहलीची  सगळी तयारी करायची जबाबदारी अर्थातच माझ्यावर होती. या कामी महाजालाची (internet) खूप मदत झाली. हॉटेल बुकिंग, प्रेक्षणीय स्थळांची माहिती, water sports activities इत्यादी वर भरपूर माहिती गोळा करून आम्ही ट्रिपसाठी सज्ज झालो. जवळपास ५ वर्षांनी आम्ही दोघंच फिरायला जाणार, त्यातही कुठल्याही टूरसोबत नाही म्हणून जास्तच excitement होती. बालीला भारतातून जायचं असेल तर मधल्या कुठल्याही देशात halt घ्यावा लागतो. माझा भाऊ सिंगापूरला असल्यामुळे आम्ही एक दिवस तिथे थांबून बालीला १ मार्चला दुपारी १२ ला पोचलो. 

इंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला  आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचं स्थान प्राप्त झालेलं आहे.

मार्च महिना तसा उकाड्याचा असल्यामुळे एअरपोर्टवरून बाहेर येताच कोकणासारखी दमट हवा पाहून आम्ही जरासे हिरमुसलो, पण गाडीत बसून सुंदर देवळाच्या आकाराचं एअरपोर्ट पाहून आमची हि नाराजी लवकरच दूर झाली. बालीच्या लोकसंख्येपैकी ९०% हिंदू रहात असल्यामुळे संस्कृतीचा वारसा त्यांना जपता आलाय. रस्त्यावरचं traffic बऱ्यापैकी भारतातल्यासारखंच होतं फक्त खड्डे नव्हते. हॉटेलच location पाहून आम्ही फुल्ल फिदाच झालो कारण हॉटेलच्या समोरचं सुंदर कुटा बीच.  बाली मधली हि सगळ्यात happening जागा. 


संध्याकाळी गाडी ठरवून  आम्ही तानाह लॉटच्या दिशेने निघालो. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताची हिरवीगार शेतं पाहून मन प्रसन्न झालं. पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेलं तानाह् लॉट हे मंदिरही इथल्या प्रसिध्द मंदिरांपैकी एक. मुख्य भूमीपासून समुद्राला जोडणाऱ्या एका खडकावर तानाह् लॉट बांधलेले आहे. पश्चिम किनाऱ्यावर असल्याने इथला सूर्यास्तही प्रसिध्द आहे. परंतु मंदिरात फक्त तिथल्या पुजार्यांनाच प्रवेश दिला जातो. 
भाताची हिरवीगार शेती 
तानाह लॉट मंदिर व सूर्यास्त पाहण्याची जागा 

मला नेहमी वाटत की चालत फिरल्यावर तिथल्या लोकांच जीवन जास्त जवळून न्याहाळता येतं. त्यामुळे परत आल्यावर आम्ही कुटा भागात भरपूर भटकलो. खरेदीसाठी, खाण्यासाठी आणि मसाजसाठी हा भाग विशेष प्रसिद्ध आहे. आम्हीही मग famous balinese massage चा अनुभव घेतला. इथल्या लोकांच खूप कौतक वाटलं मला, खूप प्रामाणिकपणे मन लावून काम करतात. कुठेही कामचुकारपणा नाही.  Customer is GOD ही उक्ती खरी ठरवून आपल्याला दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळाल्याचा आनंद देतात.  रात्री कुटा बीचवर गार वाऱ्यात फेरफटका मारण्याची मजा काही औरच. 
दुसऱ्या दिवशी Nusa Dua बीच परिसरात Parasailing, Fish fly, Scuba diving अशा water activities करतानाचा अनुभव शब्दातीत. Seafood खाऊन मन एकदम तृप्त झालं. इथल्या seafood presentation ची पद्धत पण खूप आवडली. 

उलुवाटू मंदिर परिसरातून टिपलेले एक विहंगम दृश्य 
बालीच्या दक्षिण टोकावरील पेकाटू गावामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून तीन-चारशे फूट उंच कड्यावर असलेलं उलुवाटू मंदिर हे इथलं आणखी एक आकर्षण. खोल खाली फेसाळणारा समुद्र, खडकांवर आदळणाऱ्या उंचच उंच लाटा आणि त्याच्यासमोरच मावळतीचा सूर्य असं सूर्यास्ताचं मोठं विहंगम दृश्य इथून दिसतं. पर्यटकांच्या दिमतीला इथे मोठी वानरसेना असतेच. मंदिराच्या परिसरात या वानरसेनेच्या तावडीतून गोष्टी सांभाळण्याची मोठी कसरत करावी लागते. रोज संध्याकाळी उलुवाटू मंदिरात रामायणावर आधारित प्रसिध्द केच्याक नृत्याचा कार्यक्रम असतो. केच्याक हा नृत्यप्रकार रामायणातील सीताहरण आणि लंकादहन या प्रसंगांवर आधारित आहे. केच्याकचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वाद्याची किंवा संगीताची साथ न घेता फक्त तोंडाने फक्त च्याक् च्याक् केच्याक असा आवाज ५०-६० काढत ताल धरतात आणि त्यांच्या सोबतीने राम, लक्ष्मण, सीता, रावण, हनुमान अशी एकेक पात्रे येऊन रामायणातील ही कथा घडते. यामध्ये राम, रावण, सीता, जटायू यांची वेशभूषा, त्यांची देहबोली, हावभाव, हनुमानाचा प्रवेश, त्याच्या मर्कटलीला आणि अग्नीच्या साथीने रंगवलेला लंकादहनाचा हे प्रसंग खास. भारतीय असल्यामुळे या सगळ्या कथेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते व हिंदू संस्कृतीचा अभिमान वाटतो. पण आपल्याकडे हे इतकं छान पद्धतीने का सादर केलं जात नाही याचं वाईटही वाटलं. बालीतील लोकांनी बरीच प्रसिद्धी करून इतिहास व पुराणकथांचं जतन केलं आहे याचं हे नृत्य हा उत्कृष्ठ नमुना. 

पुढच्या दिवशी सकाळी आम्ही लांबचा टप्पा गाठायचा म्हणून लवकर हॉटेलमधून बाहेर पडलो. आजचा आमचा Driver एकदम Young होता त्यामुळे त्याला चांगल इंग्रजी बोलता येत होतं.  त्याने आम्हाला बरीच माहिती सांगितली.  बालीमध्ये मुखत्वे ३ देवांना मानतात ब्रह्मा, विष्णु आणि महेश. बऱ्याच ठिकाणी गणपतीचीसुद्धा मूर्ती दिसते. रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी इथे पूजा केली जाते. पूजेचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे कानावर दोन फुले ठेवतात. चौकोनी आकाराच्या तळहाताएवढ्या केवड्याच्या पानांच्या द्रोणात काही फुले आणि त्यासोबत चॉकलेटस् किंवा फळ ठेवली जातात. हे द्रोण नंतर बालीमधील प्रत्येक घर, दुकान, हॉटेल, गाडी अशा ठिकठिकाणी ठेवलेले पाहायला मिळाले. रोज सकाळी या द्रोणांमधून देवाला नैवेद्य अर्पण करुन दिवसाची सुरुवात करण्याची इथे पध्दत आहे. एकंदरीत लोक फारच धार्मिक आणि आणि जुन्या परंपरा, चालीरीती जपणारे आहेत. खूप सुटसुटीत पद्धत ठेवली आहे पूजेची. त्यामुळे कुठल्याच मंदिराच्या बाहेर पूजेच्या सामानाच्या दुकानांची गर्दी दिसत नाही. 
मेंग्वेई मंदिर आवार 
देंपासारपासून उत्तरेकडे थोड्याच वेळात मेंगवी भागात असलेले तामान् आयून् हे मंदिर लागते. हे मंदिर तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. सुरुवातीला एक मोठे प्रवेशद्वार आणि पुढे छान हिरवळ पार केल्यावर मुख्य मंदिर लागते. इथल्या मंदिरांची प्रवेशद्वारे कमानीसारखी नसतात. दोन्ही बाजूंना दोन नक्षीदार शिल्प असलेल्या भिंती आणि त्यांच्या मध्ये असलेला आत जाण्यासाठीचा भाग एकदम सपाट. त्यावर काहीच नक्षीकाम नाही. असं वाटतं की कोणीतरी एक पूर्ण नक्षीदार भिंत बांधून मधला भाग कापून घेऊन गेलं असावं. मंदिराच्या तटबंदी असलेल्या मुख्य भागात पर्यटकांना प्रवेश नाही. पण कमरेपर्यंत असलेल्या तटबंदीतून आतील मंदिराचे अवशेष पाहता येतात. बालीमधल्या बहुतेक मंदिरांना लांबून आपल्याकडील दीपमाळेप्रमाणे दिसणारी गोपूरे दिसतात. आणि बहुतांश गोपूरांना आठ ते दहा उंच टप्पे असतात. पण जवळून पाहिल्यावर त्यावर चीनी पॅगोडाची छाप दिसते. या गोपूरांना आणि एकूणच मंदिरांच्या निमुळत्या छपरांना नारळाच्या पानांचे जाड आवरण असते आणि त्यापासून येणारा काळपट रंग या मंदिरांना एक वेगळीच शोभा देऊन जातो.

देंपासार हे राजधानीचे मुख्य शहर पार केले की निसर्गसौंदर्याने नटलेल्या खऱ्या बालीचे दर्शन घडायला सुरुवात होते. रस्त्याच्या दुतर्फा रचनात्मक घरं, अधे मध्ये भाताची शेतं, उंच नारळाची झाडं, दर ३-४ घरानंतर असणारी दगडी देऊळ असं खेड्यांच दिसणारं दृश्य मन मोहून टाकत होत. प्रत्येक घराभोवती काळ्या दगडांची तटबंदी असते आणि घराबाहेर त्याच धर्तीचे एक छोटेसे दगडी देऊळ पाहायला मिळते. इथले लोक त्याला फॅमिली टेम्पल म्हणतात. काही ठिकाणी हे देऊळ इतके मोठे असते की घर कोणते आणि देऊळ कोणते हेच कळत नाही. तसे पाहिले तर बालीमध्ये मंदिरांची काही कमी नाही. आणि इथली मंदिरे हे बालीचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. 

बेडूगुल तलाव 
उत्तर टोकाला असलेले बेडूगुल तळे आणि तळ्याकाठी असलेले उलून दानू मंदिर, बालीमध्ये मला आवडलेली अजून एक जागा. एखाद्या हिलस्टेशन सारखी मस्त थंडगार हवा पडली होती.  चहू बाजूंनी डोंगर आणि तळ्यात मंदिर, फार विहंगम दृश्य होतं.  Speed boat ने तळ्याला चक्कर मारून छान वेळ घालवून आम्ही निघालो.  वाटेत उबुदजवळ River Rafting चे  board पाहून ते करण्याचा plan बनवला. दोन्ही बाजूला गर्द झाडी, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज, डोंगरामध्ये अधून मधून वाहणारे पाणी हे सगळे पाहून डोळ्याचं पारण फिटलं. फार सुंदर अनुभव होता.  Rafting संपवून हॉटेलवर परतलो. 


तीर्थ गंगा 
पुढच्या दिवशी तीर्थ गंगा नावाच्या एका सुंदर तळ्याच्या ठिकाणी पोचलो.  इथे डोंगरातून येणार पाणी खूप शुध्द असल्यामुळे पवित्रही मानलं जातं. तळ्यात दगडांच्या खांबांचा वापर करून पायवाट तयार केली आहे. तिथून पुढे वाटेत महोगनी हॉटेलला मस्त Rice fileds च्या सान्निध्यात थंडगार हवेमध्ये भरपेट जेवलो. सध्या बालीमध्ये पावसाळी महिना असल्यामुळे अधे मध्ये पावसाच्या सरी आणि गार गार हवा यामुळे दिल एकदम खूश होगया. बैसाख हे बालीतील सगळ्यात मोठ्ठ मंदिर आहे, पण पावसामुळे पहाता आलं नाही आणि तिथल्या नियमानुसार गाईडशिवाय आत जाता येणार नाही या तिथल्या लोकांच्या फाजील हट्टामुळे आम्ही तो नादच सोडला. फक्त या एकाच देवळाच्या बाहेर आम्हाला दुकानांची गर्दी दिसली आपल्याकडे असते तशी. फसवेगिरीचा अनुभव बालीमध्ये या एकाच ठिकाणी आला. नाहीतर बाकी सगळे गुण घेण्यासारखे आहेत. गोड गोड बोलणं,  त्यांची प्रेमाने विचारपूस करण्याची पद्धत, नम्रतेने वागण्याची कला यामुळे टुरिस्टना अगदी भारावून गेल्यासारखं होतं आणि पुन्हा पुन्हा बालीला यायची इच्छा निर्माण होते. 

आमची बालीतली शेवटची संध्याकाळ पुन्हा एकदा कुटा बीचवर घालवायला आम्हाला खूपच आनंद झाला. थोडा पाऊस आणि थोडी उघडीप अशा मस्त धुंद वातावरणात मनसोक्त भटकलो. एका कॅफेमध्ये Delicious Seafood Dinner चा आस्वाद घेऊन झोपलो.  ५-६ दिवसात एकदम ताजतवान करणाऱ्या बालीला परत येण्याचं आश्वासन देऊन अतिशय उत्साहवर्धक, निसर्गरम्य अशा बालीचा आम्ही निरोप घेतला. प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच भेट द्यावी अशी हि मनमोहक नगरी.