Friday, September 25, 2009

राजगड Night ट्रेक

३ दिवसांची सलग सुट्टी जोडून येणार म्हटल्यावर डोक्यात कुठेतरी फिरायला जावं अशी चक्रं घुमू लागली.पावसाळी वातावरणात राजगडला जायची बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा पूर्ण करावी म्हणून मग तिकडे जायचा बेत पकका केला.दिवसा फार उन्हं असल्याने रात्री ट्रेक करायच ठरलं आणि मग शनिवारी संध्याकाळी २ दुचाकी काढल्या आणि मी,मानसी,श्री,लुक्या असे चौघे जण राजगडच्या दिशेने निघालो.मागच्या वेळी हायवे वरुन गेलो होतो पण या वेळी श्रीच्या सुपीक डोक्यात सिंहगडमार्गे जायचं आलं आणि गाड्या त्या दिशेने वळवल्या.बघता बघता अंधार झाला आणि त्या आडवाटेला हळूहळू भीती वाटायला लागली.

रस्त्यावर कोणीचं नव्हतं.मध्येच एखादी गाडी दिसली किंवा एखादं घर आणि घरात दिवा दिसला की मला हायसं वाटायचं.मग माझा आवाज निघायचा नाहीतर बाकी वेळ मी एकदम चिडीचूप.कारण त्यातल्या त्यात मीच जरा जास्त घाबरट आहे :) शिवाय जोडीला श्री कसले तरी विषय काढून मला अजूनच घाबरवत होता.नुकतीच आदल्या दिवशी अमावस्या झाली होती.का कुणास ठाऊक पण त्यामुळे अजूनच भीती वाटत होती.झक मारली आणि या रस्त्याने निघालो अस मला तरी वाटलं.तो अर्धा तास खूपच थरारक , रोमांचक ,भीतीदायक वाटला.राजगडच्या पायथ्याचं गाव (भोसलेवाडी) आल्यावर एकदाचं मला हुश्श झालं.तिथेच एका घरी पिठलं भाकरी खाल्ली.अंधार असल्यामुळे एकही वाटाड्या गडावर शेवटपर्यंत यायला तयार होइना.

मग एक जण अर्ध्या वाटेपर्यंत यायला तयार झाला.त्याला घेउन एका छोट्याशा बॅटरीच्या आधारे (जी अगदी शेवटच्या क्षणी श्री ने घेतली होती.धन्यवाद श्री ;) नाहीतर खरचं अवघड होतं) निघालो.एकंदरीतच वातावरण फार भीतीदायक होतं.पण मघाशीच्या रस्त्याने आम्हाला बरीच धीटाई मिळवून दिली होती.एकमेकांना समजावून आणि एका वेगळ्याच थ्रिलचा अनुभव घेण्याच्या आतुरतेने आम्ही चालायला सुरुवात केली.अर्ध्या वाटेतून वाटाड्या परत गेला.आता फक्त आम्ही चौघे,अंधार,एक बॅटरी आणि समोर राजगड.भीती कमी व्हावी म्हणून काही ना काही बोलत होतो.थोडा दम लागला म्हणून थांवलो आणि मागे वळून पाहिलं तर सगळी गावं शांत झोपली होती.३-४ दिवे उगाच मिणमिणत होते.नवरात्र सुरु असल्याने लांब कुठेतरी देवीचा जागर ऐकू येत होता , तेवढाच काय तो आवाज. एक क्षण वाटलं , मस्त गादीवर लोळायचं सोडून आम्ही हे उद्योग करायला या अंधारात कुठे आणि का येउन बसलो आहोत. आकाशात विमानं दिसत होती , वाटलं यातल्या एका विमानाने आम्हाला थेट गडावर एका सेकंदात नेउन सोडलं तर किती बरं होईल.पण मग त्यात काय मज्जा आहे ना अस समजावत परत चालायला सुरुवात केली.

१.३० तासात गडाच्या पाली दरवाज्याआधी पायऱ्या सुरु होतात तिथे पोचलो.सामान जमिनीवर टाकून चौघे तिथेच फतकल मारुन बसलो.एक वेगळचं सुख.रात्री ट्रेक केल्याचा आनंद, काहीही संबंध नसताना त्यावेळी त्या ठिकाणी आमचं तिथं असणं ,त्याची वाटलेली गंम्मत , इतका वेळ अंधारात चालत असलेल्याच झालेलं सार्थक या आणि अशा बऱ्याच संमिश्र भावना त्या वेळी मनात आल्या होत्या.

अजूनही मी थोडीशी घाबरले होतेच. म्हणावा तसा आनंद मला उपभोगता येत नव्हता , पण खरोखर मी रात्रीचा ट्रेक केला ही जाणीव सुखावणारी होती. पटतचं नव्हतं. तासभर तिथेच गप्पा मारुन मग आम्ही राजगडावर पोचलो.गडावर बरीच गर्दी होती.देवळाच्या बाहेर अर्धवट पेटलेलीच शेकोटी आम्ही पुन्हा पेटती केली आणि पुन्हा गप्पा सुरु झाल्या.प्रत्येकाला खूप म्हणजे खूप भारी वाटतं होतं. सगळ्या जागा भरल्याने आम्ही देवळाच्या ओसरीवरचं आमचं अंथरुण पसरलं.थंडीमुळे फारशी झोप लागली नाहीच मग साधारण ६ च्या सुमारास उठलो.


गर्दी टाळण्यासाठी आणि उन्हं वर यायच्या आत पटापट जमेल तितका गड फिरुन घ्यावा म्हणून मग बालेकिल्ला चढायला सुरुवात केली.

राजगड हा तसा मोठा किल्ला आहे फिरण्यासाठी. बालेकिल्ल्यावरुन संपूर्ण गडाचा परिसर म्हणजे गडाच्या तीनही माच्या - पद्मावती , सुवेळा , संजीवनी पहाता येतात.शिवाय वरुन एकीकडे दिमाखार उभा असलेला तोरणा दिसतो तर दुसरीकडे सिंहगड.राजधानीसाठी त्यावेळी योग्य निवड ठरलेला असा हा राजगड.पावसामुळे सगळीकडे हिरवे हिरवे गार गालीचे हरित त्रुणांच्या मखमालीचे असं झालं होतं.११ वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून मिरवलेल्या या किल्ल्यावर आपण काही वेळ म्हणून तरी का होईना आहोत या भावनेनी ऊर भरुन आला.माझी लहानपणापासून इच्छा आहे की एकदा तरी टाईम मशिनने मागे जाऊन शिवाजी महाराजांच्या काळात डोकवावं आणि बघाव्यात त्या लढाया,डावपेच,दरबार,महाराजांचा वावर,राण्यांचं वैभव,जिजाऊसाहेब,त्यांचं शिवबावरचं प्रेम,महाराजांवर जिवापाड प्रेम करणारे मावळे हे आणि असं बरंच काही बघायचं आहे.असो :)

बालेकिल्ला उतरल्यावर संजीवनी माचीच्या दिशेने पावले वळली. खूप मस्त दिसते नागमोडी माची.त्या माचीच्या बाजूने खालच्या गावातून गडावर यायला वाट आहे. तिथल्या मुली किंवा बायका इथे ताक विकायला येतात. आम्ही पण मग त्यांच्याकडून मस्त ताक घेउन प्यायलो.
शनिवार,रविवार मिळणार्या ५-५० रुपयांसाठी एवढी पायपीट करणारी ती काटक लोक बघून स्व:ताची लाज वाटायला लागते.एका जागी बसून २५००० कमावणारे आम्ही कुठे आणि ५० रु.कमावणार्या या बायका कुठे :) असो.

दुपारी आम्ही थोडी विश्रांती घेतली तोपर्यंत हे दोघे पोहुन फ्रेश होऊन आले. तिथेच असलेल्या दारु कोठारावर बसून ब्रेड-जामचा फडशा पाडत असतानाच ढग भरुन आले. एकदम स्वर्गात असल्याचा भास झाला. मस्त ढन खालून वर येत होते,त्या वातावरणाचा फक्त अनुभवच घेऊ शकतो :) अशा वातावरणामुळे ताजेतवाने झाल्यावर गड उतरायचा बेत रद्द करुन सुवेळा माची पहायला निघालो. माचीच्या वाटेवर एका ठिकाणी नेढं (दगडात एक मोठ्ठं भोक) दिसलं.मग काय लगेच आमची वानसेना तिकडे चढली.तिथून एका बाजूला राजगड आणि एका बाजूला ढगाने भरलेला परिसर, अहाहा :) तिथून उतरुन माचीच्या टोकावर पोचल्यावर गड एका दिवसात बघितल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहर्यावर दिसत होता.मागच्या वेळी आलो होतो तेव्हा एक तर पावसाळा नव्हता आणि आम्ही फक्त बालेकिल्लाच पाहिला होता, त्यामुळे यावेळचा अनुभव खास होता :)

पाली दरवाज्यापाशी येऊन गड उतरायला सुरवात केली.रात्री घाबरवणारा हाच तो रस्ता आता किती वेगळा वाटत होता.बऱ्याच पायपीटीमुळे उतरायला चढण्यापेक्षा जास्त वेळ लागला पण हरकत नाही एका वेगळ्याच अनुभवाची शिदोरी घेऊन आम्ही पुण्याला परतत होतो.