Tuesday, December 7, 2010

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई

या पावसाळ्यात फारसे ट्रेक करायला मिळाले नाहीत.मधल्या थोडया काळात पाऊसच पडला नाही,आणि आता थंडीची सुरुवात हवी असताना धो धो कोसळतो आहे. या संधीचा फायदा घ्यायच ठरवून आम्ही ५ जण (मी,अमेय,मानसी,स्वप्नील आणि प्रविण)पुण्याहून कारने निघालो.खरं तर यावेळी मला ट्रिप करायची होती आणि बाकीच्यांना ट्रेक. मग एक दिवस ट्रेक आणि एक दिवस ट्रिप असा प्रोग्राम ठरला आणि गाडी इगतपुरीच्या दिशेने निघाली.आमचा एक मित्र प्रसाद तिथे महिंद्रामधे काम करतो , त्याने आमची रहायची उत्तम सोय गेस्टहाऊसमधे केली होती. पहाटे ५ ला आम्ही गेस्टहाऊसवर पोचलो.रात्रीच्या प्रवासामुळे खरं तर झोप येत होती पण आमच्यातील अतीउत्साही आणि कधीही न कंटाळणार्‍या स्वप्नीलच्या आग्रहामुळे तासभर विश्रांती घेऊन पुन्हा गाडी काढून प्रसादला घेऊन आम्ही ६ जण कळसुबाईच्या पायथ्याशी असणार्‍या बारी या गावाकडे निघालो.



इगतपुरीहून साधारण ३० कि.मी.अंतरावर हे गाव आहे.सभोवती असणार्‍या बर्‍याच डोंगररांगा सकाळच्या वेळी उल्हसित करत होत्या.गावातच नाश्ता करुन ८ च्या सुमारास आम्ही चढायला सुरुवात केली.अर्ध्या-पाऊण तासातच दम लागला.बर्‍याच दिवसात ट्रेक न केल्यामुळे चालायची सवय मोडली होती.पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे त्यातल्या त्यात कमी दम लागत होता ही जमेची बाजू.मग तिथे जवळच असलेल्या एका शेड मधे लिंबुसरबत पिल्यावर जरा तरतरी आली आणि दम लागलेल्या वेळी सरबतासारखं काही मिळणं म्हणजे संजीवनीच.एकंदरीत या भागात गरिबी फार आहे.शेतीवर कसंबसं भागतं.त्यामुळे शनिवार-रविवार ट्रेकला येणार्‍या लोकांमुळे त्यांना थोडी आर्थिक मदत होते.

सरबत पिऊन नव्या जोमाने चढायला सुरुवात केली. मधल्या एका टप्प्यावर आल्यावर शिखरावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिड्यांची सोय असलेली दिसली .या एवढ्या शिड्या पार केलं की झालं, आता इथून फार काही वेळ लागणार नाही ,कशाला लोकांनी इतका बागुलबुवा केला आहे अस मनात म्हणत असतानाच एक माणूस भेटला आणि म्हणाला कि "तुम्ही अजून २५ टक्केहि अंतर चढला नाही आहात." हे ऐकल्यावर जरा धीर खचला पण ९ च वाजल्यामुळे हळूहळू गेलो तरी चालेल असं मनाला समजावत पुन्हा चालू लागलो.



एक एक शिडी चढत,मधेच असणार्‍या थोड्या पायर्‍या चढत एका डोंगरावर पोचलो.हेच कळसुबाई असं सुरुवातीला वाटलं होत पण तो आमचा भ्रम होता.आदल्या दिवशी वर रहायला गेलेला एक आजोबांचा घोळका वाटेत भेटला."अजून निम्मं अंतर राहिलय"असं ते म्हणाले म्हणून थोडा वेळ तिथे विश्रांतीसाठी थांबलो.वाटेत थोडया थोडया अंतरावर ऊन आल्यामुळे वेग मंदावत होता.पण तरीही चालणं थांबवत न्हवतो.एका नंतर एक असे २-३ छोटे छोटे डोंगर चढल्यावर एकदाचं खरं खरं कळसुबाईचं शिखर धुक्यात लपेटलेलं दिसलं.अजून इतकं चालायचं म्हटल्यावर राहू दे इथेच थांबू असा क्षणभर मनात विचार आला "पण एवढ्या वर येऊन थोडक्यासाठी माघार घेणं या सह्याद्रीच्या लेकरांना शोभेल का ?  हळूहळू चालू फार फार तर एका ऐवजी दोन तास लागतील इतकंच."असं ठरवून पुन्हा चालायला सुरुवात केली.


या ठिकाणाहून मागे वळून पाहिलं आणि आपण किती उंचावर आलोय याचा अंदाज आला.पायथ्यापासून उंच वाटणारे डोंगर आता आमच्यापेक्षा बरेच खाली असल्याचं जाणवलं.सभोवतीचा परिसरही छान दिसत होता.शेवटची शिडी पार करुन वर पोचलो आणि जग जिंकल्याचा आनंद झाला.

खालच्या गावातून आमच्यासोबत चार कुत्री आली होती अगदी वरपर्यंत.खुप आश्चर्य वाटलं आणि कौतुकही.त्यांनी तर चढताना आम्हाला एकदा रस्ता चुकण्यापासून वाचवलंही होतं.काहीतरी खायला मिळेल या आशेने कदाचित ती आली असतील पण आम्ही त्यांना निराश केलं कारण दिवाळीच्या फराळातलं फारसं काही त्यांना खाण्यासारखं नव्हतं.खाली येईपर्यंत त्यांनी आम्हाला सोबत केली.आत्तापर्यंत प्रत्येक ट्रेकला आम्हाला यांच्या बांधवांनी सोबत केली आहे.दत्तमहाराजांची कृपा .


तिथे वर छोटसं कळसुबाई देवीचं मंदिर आहे. जवळच असलेल्या कठड्यावर बसून दिवाळीच्या वेळी घरून आणलेला चिवडा,चकली आणि लाडूचा फडशा पाडला आणि तिथेच मस्त ताणून दिली. स्वप्नील एकदम टोकाला झोपला होता. तो झोपेत जरा इकडे तिकडे हलला असता तर खाली थेट दरीच. पण असं काही झाल नाही  दमल्यामुळे अंगावर ऊन येऊनही डुलकी लागली. एक छोटीशी डुलकी काढून पुन्हा ताजेतवाने झालो. या ठिकाणाहून आजूबाजूचा बरार परिसर न्हाहाळाता येतो. भंडारदरा धरणाचे back water ही दूरवर पसरलेले दिसते. नेहमीप्रमाणे भरपूर फोटो काढून आम्ही परतायच्या वाटेला लागलो.


शिड्या उतरताना खालची दरी पाहून आधीच भरुन आलेले पाय थोडेसे थरथरायला लागले होते पण हळूह्ळू बसत बसत, कुठेही धडपडणार नाही अशा रितीने उतरु लागलो. मधे परत एका ठिकाणी सरबत पिल्यावर तरतरी आली. इतक्यात ढगांचा गडगडाट ऐकू आला आणि मग मात्र मी पायांची गती वाढवली. कारण एकदा जर पावसात अडकलो तर उतरणं फार अवघड झालं असतं. कारण उतरतानाची वाट मातीतूनचं जात होती आणि पाऊस पडल्यावर तिथे चिख्खल पसरला असता.अडीच तासात खाली बारी गावात पोचलो आणि निवांत बसलो. आधीच दोघातिघांनी जाऊन जेवणाची ऑर्डर दिली होती.

सकाळी न झोपताच निघायचा स्वप्नीलचा निर्णय बरोबर ठरला होता.त्यामुळेच पावसाच्या तडाख्यातून वाचलो होतो म्हणून त्याची भरपूर स्तुतीही केली. पूर्ण उन्हात हा ट्रेक करणं जरा अवघड आहे, कारण नुसताच चढ आहे. उतार-चढ असं काही नाही शिवाय जसंजसं वर जाऊ तशा सावलीच्या जागा कमी आहेत.

गावातील एका घरात पिठलं भाकरी भात(ट्रेकच्या वेळी उपलब्ध असणारा एकमेव मेनू) आणि भाजी(खूपच तिखट असूनही कडकडून भूक लागल्यामुळे पाणी पीत पीत खाल्ली) अशा घरगुती जेवणावर ताव मारला. पुन्हा एकदा इगत्पुरीला जाताना वळून कळसुबाईकडे कटाक्ष टाकल्यावर मन सूखावून गेलं. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (उंची १६४६ मी.) सर केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता.

Photo link
http://picasaweb.google.com/117906750302735376522/Kalsubai?authkey=Gv1sRgCLnc5oPFuYXV6AE&feat=email#