Friday, August 28, 2009

दिल्ली ट्रिप

जायचं का नाही , office मधे रजेसाठी कोणतं कारण सांगायचं , असे अनेक प्रश्न बाजूला सारून शेवटी एकदा दिल्लीला जायचं विमानाचं तिकिट काढलं.मग फोनाफोनी सुरु झाली. तिकडे गेल्यावर काय काय बघायचं , कुठे कुठे जायच , यावर चर्चासत्र रंगू लागली आणि जायच्या आदल्या दिवशीच मला विमान रद्द झाल्याचा sms आला.पण आमची बाकी मंडळी train नेच जाणार होती मग आयत्या वेळी त्यांच्यातच घुसून जायचं ठरवलं.पण विमान रद्द झालं तेच बर झालं इतकी मज्जा आली , आमच्या कुगाडीत. पत्ते ,गाणी आणि दंगा तर सदा पाचवीलाच पुजलेला असतो. एक पूर्ण दिवस धुडगूस घातल्यावर भल्या पहाटे आग्र्याला पोचलो.एवढी थंडी पहिल्यांदाच अनुभवत होतो सगळे. पण मस्त वाटत होतं. रोजच्या त्या routine जगातून मुक्त झाल्यासारखं. एखाद्या स्वच्छंदी पक्षासारखं. तिथेच जवळ एका hotel मधे सामान ठेवून आवरुन आम्ही बाहेर पडलो.एक गाडी ठरवली फिरायला. तोपर्यंत आम्हाला बाकी तीन जण जे दिल्लीहून निघाले होते ते भेटले.लाल किल्ला खरोखर अप्रतिम आहे ,मुख्य म्हणजे प्रवेशद्वारातच शिवाजी महाराजांचा पुतळा पाहुन भरुन आलं.
आणि पुतळ्यासमोरच भव्य असा लाल किल्ला आहे. प्रवेशद्वारातून प्रवेश करत असतानाच त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती. किल्ल्याचा आवारही फार मोठा आहे ,त्यामुळे बराच वेळ द्यावा लागतो फिरण्यासाठी.
तिथल्या नीट बांधणीमुळे आणि स्वच्छतेमुळे तर किल्ल्याच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. आतील इमारतींवरील नक्षीकाम ,मीनाकाम एकदम मनमोहक. पण दिवसेंदिवस त्यावरील रंग फिकट होत आहेत. दरबार भरत असलेल्या जागेवरील नक्षी त्यातल्या त्यात अजून टिकून आहे.
तिथून मग जगातलं सातवं आश्चर्य(?) असलेल्या ताजमहालाकडे आमचा चमू वळला. सुरुवातीलाच आमची थोडी निराशा झाली कारण बाहेरील परिसर बराच अस्वच्छ आहे. पण एकदा का आत गेल की सगळं विसरायला होतं. खूप सुंदर वास्तू आहे. मग आम्ही तिथे बराच वेळ फोटोग्राफी केली.एक वेगळचं feeling आलं होतं सगळयांना.

तिथून निघाल्यावर दिल्लीला पोचायला रात्र झाली. दिल्लीचं बऱ्याच वर्षांनी होणारं दर्शन सुखावणारं होतं. रात्री हरिद्वारला जाणारी ट्रेन पकडली. रात्रभर पुन्हा पत्ते, दंगा , गप्पा. जसंजसं उत्तरेकडे चाललो होतो थंडी वाढतच होती. खरं तरं हे काय आमचं देव देव करायचं वय नाही पण तरी आम्ही हरिद्वारला आलो याच कारण पुढे आम्हाला River Rafting साठी ह्रुषिकेशला जायचं होतं. हरिद्वारला घाटावर गंगेचं पहिलं दर्शन मनाला मोहवून टाकणारं होतं. एवढं स्वच्छ पाणी असेल असं खरंच वाटलं नव्हतं. एक-दोन तास गप्पा मारून पण उठावसंच वाटतं नव्हतं.

पण पुढे अजून एक मंदिर बघायचं असल्याने उठलो. तिथेच जवळ डोंगरावर मनसा देवीचं मंदिर आहे. रोपवेने जायला मजा आली. इथे पुन्हा आम्हाला अजून थोडे मित्र येउन मिळाले. मस्त पराठ्याचा नाश्ता /जेवण करुन ह्रुषिकेशच्या दिशेने आमचा १८ जणांचा चमू निघाला.

ह्रुषिकेशला लक्ष्मणझुला पाहुन Rafting camp (शिवापूर)ला पोचलो.Camp च एकूणच वातावरण एकदम भारी होतं.गंगा नदिकिनारी तंबू ,Campfire ,समोर मोठ्ठा डोंगर ,खेळायला भरपूर वाळू आणि पंजाबी जेवण. अहाहा. मन एकदम त्रूप्त झालं.

दुसऱ्या दिवशी सकाळी Rafting करायला निघालो. जवळ जवळ ३.३० तास गंगेच्या पाण्यात नुसता धुडगुस (सगळी पाप धुवून टाकली.. आता नवीन करायला आम्ही मोकळे ;-)). पहिल्यांदा पाणी अंगावर आलं तेव्हा ब्रम्हांड आठवलं. खरं अविस्मरणीय अनुभव. त्या दिवशी थोडा तिथेच दंगा करून रात्री पुन्हा दिल्लीकडे प्रयाण.

आमच्यापैकी एक जण दिल्लीमधेच रहात असल्याने त्याच्या घरीच आवराआवर करुन दिल्ली पहायला बाहेर पडलो. एकच दिवस असल्याने आणि सगळचं पहायची उत्सुकता असल्याने सगल्या ठिकाणी थोडाच वेळ थांबून आम्ही बाहेर पडत होतो. लोटस मंदिर ,कुतुबमिनार ,लाल किल्ला (हा बाहेरूनच पाहिला, आग्र्यामधे एकदा पहिल्यामुळे याची उत्सुकता कमी झाली होती.), पराठा गल्ली (इथले दही भल्ले ,लस्सी अहाहा), नवीन झालेली मेट्रो आणि रात्री India Gate.

College सोडल्यापासून १८ जण असे पहिल्यांदाच जमल्यामुळे ट्रिपला वेगळीच मज्जा आली आणि यावेळी सगळे कमावते असल्यामुळे हात जरा सैलच सोडला होता. पाहिजे ते खा,प्या,फिरा.

पुढच्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन मी मुक्काम पोस्ट पुण्याला विमानाने आले (या वेळी विमान रद्द न होता धुक्यामुळे फक्त ८ तास उशीरा सुटले. त्यापेक्षा ट्रेनने लवकर आले असते असं वाटलं. पण असो).

माझी जपान सहल

ब-याच खटपटींनंतर आणि मनस्तापानंतर एकदाचा जपान व्हिसा मिळाला. शनिवारी रात्रीच्या Cathe Pacific विमानाने मी, आई, बाबा आणि गुळवणी काका असे चौघे जपानच्या सहलीसाठी बाहेर पडलो.मुंबई ते Hong Kong आणि मग Hong Kong ते नरिता विमानतळ असा आमचा प्रवास होता.विमानात प्रत्येकाच्या seat समोर एक छोटा LCD TV दिलेला असतो. त्यावर भरपुर चित्रपट असतात. त्यामुळे कंटाळा काही आला नाही किंवा त्रास असा काय म्हणतात तो झाला नाही. शिवाय जेवणही चांगलं होतं अर्थात पहिल्या वेळी सगळं छानच वाटतं ही गोष्ट वेगळी. Hong Kong विमानतळावर उतरताच कल्पना आली की आता आपण एका वेगळ्या विश्वात प्रवेश करतो आहोत. स्वप्नांच्या जगात. जिथे सगळं कस छान छान असणार आहे. तिथले कर्मचारी, त्यांची कामातली तत्परता , आजूबाजूची मोठमोठी दुकाने (ज्याला आजकाल आपण shopping Mall म्हणतो) ,सगळीकडे सरकते जिने , झगमगाट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथली स्वच्छता हे सगळं बघून खरोखर मन चाट पडल(इतक्या स्वच्छतेची आपल्याला सवय नाही ना ;-) ). Hong Kong विमानतळाला मागच्या वर्षी भव्यतेसाठी आणि नीटनेटकेपणासाठी बक्षिस मिळालं होतं. हे सगळं पाहून मग आम्ही नरिताला जाणा-या विमानात बसलो. इथून खरी भाषेची अडचण जाणवू लागली आणि आता पुढ्चे १५-२० दिवस आम्हांला वेगळ्या चेहर्यामोह-याच्या लोकांच्यात वावरायचं आहे हे कळलं.

५ तासाच्या प्रवासानंतर एकदाच नरिता विमानतळावर आम्ही उतरलो. Immigration, customs असले सोपस्कार उरकून बाहेर आलो आणि दादा, गिरिष दादा दिसले. त्या वेळी आम्हाला जे काही वाटलं ते अर्थातच शब्दात सांगता येण कठीण आहे. ६-७ महिन्यांनी आम्ही भेटत होतो आणि तेही जपानमधे. मी, आई, बाबा आणि काका सगळे एकत्र भेटलो म्हणून ते दोघेही खूष होते. तिथून Train ने आम्ही दादाच्या घरी गेलो. Train ची वेळापत्रके आणि स्टेशनवरील एकूणच स्वच्छता लक्ष वेधून घेत होती. अर्थात सगळीकडेच कमालीची स्वच्छता ठेवण्यात आली आहे. शिवाय खूपच Posh आणि मोठ्ठं आहे. अगदी सेकंदाचाही विलंब न करता Train ठरलेल्या जागी कशी काय उभी रहाते याचंच राहून राहून आश्चर्य वाटत होतं. तिथल्या Taxi सुध्दा फारच आलिशान होत्या. तिकडे २४ तास Signal पाळले जातात मग भलेही रस्त्यावर चिटपाखरुही नसो. :-). रात्री एकट फिरायला ते लोक अजिबात कचरत नाहीत. एकदम प्रामाणिक लोक आहेत. सापडलेली वस्तू चौकशी करून परत आणून देणारी.दोन खोल्यांच्या छोटयाशाच पण छान लाकडी घरात दादा रहातो.जपानमधे सारखेच भूकंप होत असल्यामुळे तिकडे लाकडाचा वापर बांधकामासाठी केला जातो.त्यामुळे दर २५ वर्षांनी जुन्या घराला पाडून नवीन घर बांधल जातं. जागेचा अभाव असल्यामुळे आटोपशीर पण नीटनेटकी, थंडीपासून बचाव व्हावा अशी रचना प्रत्येक घरामध्ये आढळते. Flooring साठी फरशीऐवजी तातामीचा(एक प्रकारची चटई) वापर करतात.वर्षातील बराच वेळ पाऊस आणि बर्फ पडत असल्यामुळे घरावर वेगवेगळ्या रंगांची उतरती छपरे असतात.भारतातूनच सगळं सामान आणल्यामुळे जपानमधे असूनही आम्हाला आईच्या हातची मस्त भाजी-भाकरी खायला मिळाली. दादाला तर खरंच वाटेना की तो जपान मधे बसून जेवतो आहे. ;-)

जपानमधे प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत असताना एक वाद्य , एक खेळ आणि एक कला (Judo , Karate etc ) शिकावीच लागते.तिकडे नोकरी मिळण्यासाठी शिक्षणाची गरज असत नाही.मुलं खूप लवकर आपापल्या पायावर उभी रहातात. दुसर्या दिवशी आवरुन आम्ही दादाची University पहायला बाहेर पडलो.खरं तर आम्ही जपान पहायला आलो होतो पण आमच्या वेशभूषेमुळे (विशेषत: आईच्या साडीमुळे) आम्हीच तिथल्या लोकांसाठी प्रेक्षणीय झालो होतो. :-) दादाच्या University चा परिसर एकदम मस्त हिरवागार आहे , एकदम आमच्या वालचंद महाविद्यालयाची आठवण झाली. तिथून संध्याकाळी आम्ही Tokyo Tower बघायला बाहेर पडलो. Eiffel Tower पेक्षा हा Tower उंच आहे. Tower वरुन Tokyo शहरचा नजारा एकदम जबरदस्त दिसतो. रात्री सगळीकडे दिवे लागल्यावर तर एकदमच मस्त दिसत. आम्ही अगदी शेवटच्या Observatory पर्यंत गेलो होतो.
मानवी निर्मितीचा एक उत्तम नमुना म्हणून या tower कडे पाहिले जाते.पुढच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिलला ६.३० च्या शिंकानसेनने(Bullet Train) आम्ही जपानच्या दक्षिण टोकाकडे असलेल्या हिरोशिमाच्या दिशेने कूच केले. शिंकानसेनचे तिच्या वेगानुसार(२५० Km/Hr ते ३२५ Km/Hr) पाच प्रकार आहेत. विमानापेक्षाही आरामदायी असल्याचा अनुभव या Train मधे आला. जपानमधे फिरण्यासाठी Japan Railway (JR) ने परदेशी पर्यटकांसाठी एका पासची सोय केली आहे. ७ ,१४ आणि २१ दिवसांसाठी हा पास उपलब्ध आहे. आम्ही ७ दिवसांचा पास भारतातूनच काढून घेउन आलो होतो. यामध्ये तुम्ही ७ दिवस शिंकानसेन आणि इतर काही Trains मधून अमर्यादित प्रवास करु शकता.
शिंकानसेनचा वेग जरी ताशी २५० च्या आसपास असला तरी आत बसल्यावर तुम्हाला त्याची जाणीव होत नाही. या Train च्या बाबतीत आणि एकंदरीतच जपानी अगत्याविषयी अगदी ठळकपणे लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे Train मधे खाद्यपदार्थ विकायला JR ची एक कर्मचारी मुलगी फिरत असते.प्रत्येक डब्याच्या शेवटी गेल्यावर ती वाकून जपानी पध्द्तीने नमस्कार करते. इतकी नियमितता आणि आदरातिथ्य पहायला मिळणं विरळाच नाही का ?हिरोशिमा हे एकेकाळी उध्वस्त झालेलं शहर होतं हे तिकडे गेल्यावर सांगावं लागतं इतकं त्यांनी त्याला आधुनिक केलं आहे...आम्ही जपानी पद्धतीच्या hotel मधे उतरलो होतो.जपान मधे फिरायचं असेल तर जपानी यावंच लागतं. दादाला उत्तम जपानी येत असल्यामुळे आमचं कुठेच काही अडलं नाही.जपानी आदरातिथ्याचा अनुभव आम्हाला यावेळी आला. तिकडचे सगळेच लोक हळू आवाजात आणि एकदम अदबीने बोलतात.इतक्या नम्रपणे तिथले कर्मचारी बोलत, वागत होते की आम्ही थक्क झालो.अर्थातच दादाला जपानी येत असल्याने त्यांनाही त्याचा आदर, आनंद वाटत होता..आणि त्याच्या अनुषंगाने आमचासुद्धा.:-) जपानी hotel मध्ये आपल्यासारखीच खाली गाद्या घालून झोपायची पद्धत आहे..त्यामुळे एकदम घरच्यासारख वाटत होत.शिवाय प्रत्तेक रुमची आतील सजावट लाकडाचा वापर करुन केलेली असते. Hotel मधेही जमिनीवर तातामी पसरलेली असते. जपानी वातावरणाचा अनुभव यावा यासाठी मुद्दामच दादाने आमची जपानी Hotelमध्ये सोय केली होती. तिकडे आपल्यासारखीच खाली गादी घालून झोपायची सवय आहे त्यामुळे अगदी घरच्यासारखं वाटतं होतं. खोलीमध्ये सामान ठेऊन आम्ही हिरोशिमा पहायला बाहेर पडलो.

हिरोशिमामध्ये अणु Bomb ज्या इमारतीवर पडला ती इमारत(Hiroshima Dome) जतन केली आहे. आणि त्या वेळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जवळच Peace Memorial Park बनवला आहे. तिथेच एक वस्तुसंग्रहालय आहे ज्यामध्ये त्यावेळच्या काही घटना, चित्रे जतन केली आहेत.तिथून पुढे जवळच हिरोशिमा castle आहे. तोही पहाण्यासारखा आहे.सगळीकडे भरपूर झाडे लावली असल्याने कुठल्याही ठिकाणी गार आणि शांत वाटत होतं. रात्री मग आम्हाला एक भारतीय restaurant मिळालं. सगळीकडे माशांचा आणि मांसाचा वास येत असल्याने खायचे थोडे हालच होत होते. त्यामुळे भारतीय पद्धतीचे जेवण बघितल्यावर तोंडाला पाणी सुटले.

दुसर्या दिवशी मग आम्ही Miagimaguchi या ठिकाणासाठी पहिल्यांदा Tram मधे बसून आणि मग नंतर फेरी बोटीतून गेलो. हे ठिकाण समुद्रकिनारी आहे. इथे एक मंदिर(Shrine) आहे शिवाय एक स्तूप आहे ज्याला जपानच्या संग्रहातील गोष्टींपैकी एक मानलं जातं.खूपच सुंदर जागा आहे. तो स्तूप आणि ते shrine यांना गडद केशरी रंग दिला आहे. हा रंग खास नैसर्गिकरित्या बनवला जातो. परिसरात बरीच हरिण मोकळी सोडली आहेत.(पहिल्यांदा कुठेतरी जिवंत प्राणी पाहिला :-) वाटेतच मला एक किमोनो घातलेली मुलगी दिसली मग मी लगेच तिच्याबरोबर फोटो काढून घेतला. (आज काल किमोनोचा वापर कमी होत चालला आहे. तिकडेही अमेरिकेचं वार लागल्याने सगळयाच वयोमानाच्या महिला जीन्स मधे दिसतात.) तिथून पुढे जवळच Mapal च्या झाडांची मोठी बाग आहे. या झाडांची पान थंडीच्या दिवसात लाल होतात. याच परिसरात थोड पुढे गेल्यावर Ropeway आहे. Ropeway च्या वाटेवर खाली Mapal च जंगल दिसत आणि वर पोचल्यावर Miagima चा सगळा परिसर दिसतो. हे सौंदर्य मनात साठवून आम्ही शिंकानसेनने क्योतो या ठिकाणी मुक्कामाला पोचलो.

क्योतो ही जपानची जुनी राजधानी होती. त्यामुळे इथे सगळे रस्ते, घर अगदी आखीव आहेत. प्रत्येक शहरात फिरण्यासाठी बस, रेल्वे, ट्राम यांची अतिशय चांगली सोय जपान सरकारने केली आहे. मंदिरांसाठी क्योतो हे शहर खास प्रसिध्द आहे. आम्ही एक दिवसाचा बसचा पास काढला होता. बसमधे फक्त Driver असतो. त्याच्यापाशीच तिकीट तपासायचं यंत्र असतं. कौतुकाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रवासी उतरताना हा Driver त्याला आरिगातोओ गोझाइमास(धन्यवाद) असं म्हणतो आणि तेही चेहर्यावर हसू आणून , न थकता. त्याचा असा Stamina बघून मी तर थक्क झाले. शिवाय कितीही वय असलं तरी या लोकांना बसमधे जागा करुन दिलेली किंवा दया दाखवलेली आवडत नाही. ते उभं रहाणचं पसंत करतात.

आम्ही फिरायला निघालेला आठवडा Golden Week चा असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे सगळीकडे गर्दीच गर्दी होती. मुक्कामाच्या दुस-या दिवशी आम्ही Ginkakuji Temple(Silver Temple) आणि तिथला राजवाडा पाहून आलो. रात्री Geion म्हणून एक जागा आहे जिथे जुन्या काळची जपानी घर जतन केली आहेत ते पाहून आलो. पुढच्या दिवशी Kinkakuji Temple(Golden Temple) हे प्रसिध्द मंदिर पाहिलं. देवळाच्या बाहेर जपानी पंखे , मिठाई , किमोनो यांची बरीच दुकाने होती. जपानी लोक खाण्याची शौकिन आहेत एकदम. फिरण्यापेक्षा खाण्याकडेच त्यांचा ओढा अधिक असल्याचं जाणवलं. ज्या प्रदेशात जे जे मासे, खेकडे किंवा मिठाई मिळते ते खाण्यासाठीच ही लोक गर्दी करतात.


दुपारी Botanical Garden मधील विविध रंगांची आणि जातीची फुल बघून आम्ही Sanjusandoji मंदिरात पोचलो. या मंदिरात बौध्दाच्या १००० धातूच्या पुरातन मूर्ती जतन केल्या आहेत. शिवाय विष्णु , लक्ष्मी, गंधर्व अशा अनेक भारतीय देवदेवतांच्या मूर्ती आहेत. प्रत्येकाची अगदी सविस्तर माहिती लिहिलेली आहे. अशा या क्योतोचा निरोप घेउन आम्ही परत घरी परतलो.

मधे एक दिवसाची विश्रांती घेउन आम्ही जपानच्या उत्तर टोकाकडे असणार्या Hokkaido या बेटावरील Hakodate या शहराकडे निघालो. जपान हा देश बर्याच छोट्या मोठ्या बेटांचा समूह आहे. त्यापैकीच हे एक बेट. या बेटावर जाण्यासाठी समुद्राच्या खाली ५३ किमी. चा बोगदा केला आहे. इथे जाण्यासाठी एक Train आहे. या Train च्या प्रत्येक सीटच्या मागे एक वेळापत्रक(किती वाजता Train बोगद्यात शिरेल आणि किती वाजता बाहेर पडेल) लिहिलेल आहे आणि त्या बोगद्याचा नकाशाही आहे. हे वेळापत्रक अगदी काटेकोरपणे पाळले जाते.त्या त्या वेळीच Train आत शिरते आणि बाहेर येते. :-) वेळ पाळावी तर जपानी माणसानेच असा विचार क्षणभर माझ्या मनात डोकावून गेला.

हकोदाते हे जपानच काश्मिर मानलं जात. फिरण्यासाठी आम्ही एक कार भाड्याने घेतली पण पोचलेल्या पहिल्याच दिवशी पावसाने आमच्या सगळ्या बेतांवर पाणी फिरवलं. मग नुसतच इकडून तिकडून भटकून Hotel वर परतलो. दुसर्या दिवशी मात्र आभाळ एकदम स्वच्छ होतं. जपानमधे अनियमित असणारी बहुधा एकच गोष्ट असावी, हवामान. झटक्यात ऊन तर पाहता पाहता पाऊस. त्यामुळे लोक weather forecast बघूनच बाहेर पडतात.(पण अशा अचानक झालेल्या फजितीमधेही एक गंम्मत असते हे त्यांना कधी कळणारच नाही. नाही का ?)

दादाला आता जपानच्या रस्त्यांची आणि वाहतुकीच्या नियमांची चांगलीच सवय झाल्यामुळे आणि गाडी असल्यामुळे पाहिजे तिथे आणि पाहिजे तेवढा वेळ मनसोक्त भटकलो. शहरातील Onuma Park हा तलावांसाठी आणि मनमुराद भटकंतीसाठी ओळखला जातो. तिथून मग आम्ही Mount Hakodate या अतिशय प्रसिध्द ठिकाणी पोचलो. इथून संपूर्ण शहराचा परिसर न्याहाळता येतो. शहराच्या दोन्ही बाजूला Pacific महासागर आहे. खर तर ही जागा रात्री पहाण्यासाठी पर्यटक येतात पण पावसामुळे रात्री आम्हाला येता आल नाही. रात्री सगळीकडे दिवे लागल्यावर या शहराकडे वरुन पहाताना आकाशातले तारे जमिनीवर उतरल्याचा भास होतो असं म्हणतात. अर्थातच म्हणून काही दिवसा याच सौदर्य कमी होत नाही.:-)


इकडून खाली यायच्या वाटेवर आम्हाला ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केला तो साकुरा(Cherry Blossom) दिसला. काय आनंद झाला. शब्दातीत. वर्णनातीत. जवळपास २०-२५ झाड साकुर्याने बहरली होती. पांढर्या गुलाबी रंगाची फार नाजूक फुल असतात ही. वार्याबरोबर पाकळ्या पडत असतात त्यामुळे जास्त दिवस नाही रहात झाडावर. खूपच सुखद अनुभव होता साकुरा पहाण्याचा. तिथून जवळच असलेली २-३ चर्च पाहून जपानदर्शनाचा कार्यक्रम आटोपता घेऊन आम्ही दादाच्या मुक्कामी पोचलो.


या ५-६ दिवसांत जवळपास ३००० किमी चा टप्पा आम्ही पार पाडला. हे सगळं शिंकानसेनमुळे शक्य झालं.

पुढचे २-३ दिवस दादाचे भारतातले मित्र आणि जपानचे मित्र यांच्याबरोबर जेवणाचा कार्यक्रम झाला. एक दिवस जवळच Hakkejima इथे एक aquarium आहे तिथे गेलो होतो. ध्रुवीय अस्वल , dolphin , Seal , penguins, shark ,whale, खेकडे आणि बर्याच जातीचे मासे, समुद्रातले प्राणी पहायला मिळाले. Dolphin Show हे तिथल खास वैशिष्ठ्य.

आजूबाजूच्या ठिकाणी असाच फेरफटका मारताना जाणवलं की सगळीकडे मोठमोठी दुकानच आहेत. आपल्यासारखी किराणा मालाची किंवा इतर छोटी दुकान तिथे नाहीत.
सगळ कसं well structured, well managed आहे.कुठेही लाडीलबाडी, फसवाफसवी नाही.
नियम आणि शिस्त हे जपानी माणसाच्या अंगातच भिनलेलं आहे. आणि म्हणूनच कदाचित हिरोशिमा , नागासाकी सारख्या भीषण घटना घडूनही हा देश आज ताठ मानेने घट्ट पाय रोवून जगासमोर उभा आहे.

अशा तर्हेने मनमुराद फिरुन, नवीन जग अनुभवून एक अविस्मरणीय अनुभव घेऊन मी भारतात यायला निघाले.