Friday, July 26, 2013

लोहगड

हो नाही हो नाही करता करता जवळपास वर्षाने  मी पुन्हा ट्रेकसाठी आमच्या ग्रुपसोबत बाहेर पडले. यावेळचा गड होता लोहगड. तसा  फार मोठा नाही चढायला. आम्ही सहा जण तीन दुचाकींवर स्वार झालो आणि दहा च्या दरम्यान पुणे सोडलं. खर तर साधारण ५ वर्षांपूर्वी मी हा ट्रेक एकदा केला आहे पण तरीही पावसाळा सुरु झाल्याने अमेय सोबत जायचं म्हणून मी नव्या उमेदीने निघाले. पुण्याहून साधारण ४० कि. मी. अंतरावर असणाऱ्या मळवली गावात गाड्या लावून आम्ही चालायला सुरुवात केली. गेल्या १०-१५ दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे सगळीकडे हिरवंगार दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. नवीनच तयार  झालेल्या धबधब्याजवळ बरीच गर्दी दिसत होती. खूप मोह झाला तरी आम्ही तिथे भिजण टाळून चालायला सुरुवात  केली. ट्रेकला एवढी गर्दी मी पहिल्यांदाच पाहत होते. एरवी सिंहगडला खूप गर्दी पहिली आहे पण आजचा अनुभव निराळा होता. एकीकडे आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. विशेषतः युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.बऱ्याच दिवसांनी एवढ चालत असल्यामुळे सुरुवातीला धाप लागत होती पण धुक्यात लपलेला लोहगड खुणावत होता. त्यामुळे अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद घेत रमत गमत एका तासाने आम्ही पायथ्याशी पोचलो. आणि मग या एवढ्या गर्दीच कारण मला कळल. लोणावळ्यापासून लोहगड पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता केला आहे त्यामुळे गाडीने येण लोकांना सोप्प झालं आहे. 

या  पायथ्यापासून गडापर्यंत पायऱ्या आहेत. खर तर चढाचा रस्ता असेल तरी काही वाटत नाही पण पायऱ्या आल्या की आम्हाला कंटाळा येतो :) पण यावेळी वरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे जरा मज्जा आली.

महादरवाजा आणि प्रवेशद्वार यापाशी बुरुजांचे बांधकाम अजूनही टिकून आहे. पावसामुळे गड फारसा फिरून पाहता आला नाही. गडावर सध्या बांधलेलं एक देऊळ आणि दोन तळी आहेत. फिरत फिरत एका कडेला सुसाट्याचा वारा वाहत असताना बराच वेळ उभं राहून आम्ही आमची फोटोग्राफीची हौस भागवून घेतली. थोडा वेळ थांबून मग आम्ही उतरायला सुरुवात केली. पायऱ्या उतरताना पाय भरून आले पण थंड वातावरणामुळे थकवा जाणवला नाही. 

पायथ्यापाशी आल्यावर मग पोटोबासाठी गरम गरम कणीस आणि कांदा भजीवर ताव मारला आणि पुढे निघालो. वाटेत विसापूरचा किल्ला खुणावत होता पण वेळेअभावी त्याला पुन्हा कधीतरी भेट द्यायच्या आश्वासनासह आम्ही परतलो.