Tuesday, October 6, 2009

आंजर्ले


कोकण! निळाक्षार समुद्र,संध्याकाळी समोर दिसणारा सूर्य आणि त्याचे आकाशात पसरलेले विविधरंगी किरण, समुद्रकिनारी पसरलेली मऊ वाळू,वाळू जिथे संपते तिथून सुरु होणारी नारळा-पोफळीची, केळ्याची बाग, या बागेत पाटात सोडलेलं पाणी, बाग संपल्यावर एका बाजूला असलेला गाई म्हशींचा गोठा ,त्याला लागून असलेलं कौलारु घर,घराच्या सोप्यामध्ये असलेला लांबलचक झोपाळा ,घरासमोरचं मोठ्ठं अंगण. अहाहा. नुसतं कोकण म्हटलं कि या एका शब्दावर हे सगळं चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर उभ रहातं.

माझे बावा कृषि अधिकारी असल्यामुळे सतत फिरतीची नोकरी असायची.मी लहान असताना १ली ते ५वी आम्ही रत्नागिरीला होतो.लहानपणची वर्षे कोकणात गेल्यामुळे मला कोकणाविषयी विशेष प्रेम आहे.त्या वेळी तिथला जवळपासचा सगळा भाग आम्ही पालथा घातला होता. प्रत्येक वेळी कोणी नवीन पाहुणा आम्हाला भेटायला रत्नागिरीला आला की आम्ही त्याला काही ठराविक ठिकाणी घेऊन जायचो,जसं पावस ,गणपतीपुळे, हरिहरेश्वर आणि आंजर्ले. त्या बऱ्याच ठिकाणांपैकी माझ्या स्मरणात कायम घर करुन राहिलेलं आणि मला परत परत जायची इच्छा होणारं गाव म्हणजे आंजर्ले. बाबांच्या ओळखीच्या एक काकू आहेत दांडेकर काकू,दर वेळी आम्ही तिथेच उतरायचो.त्यांच्या घराचा परिसर म्हणजेच माझ्या मनावर कोरलेलं कोकणाच ते चित्र आहे.

या वेळी बऱ्याच म्हणजे जवळपास १०-१२ वर्षांनी पुन्हा एकदा तिकडे जायचं ठरवलं.आमचा कंपू कोकणात जायच आणि समुद्रात भिजायचं म्हटल्यावर एका पायावर तयार झाला.- जणांसाठी सुमो बुक करुन आम्ही आंजर्ल्याच्या दिशेने निघालो. नेहमीप्रमाणेच गाडी मध्ये दंगा,गाणी,गप्पांमुळे तास प्रवासाचा वेळ कसा गेला ते कळलचं नाही.गावाकडे घाटावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन संपूर्ण गाव दिसतं.खरं तर गाव दिसतच नाही कारण सगळी घर नारळाच्या गर्द हिरव्या झाडीत लपली आहेत आणि ती हिरवाई संपली की त्यालगत असलेला दूरवर पसरलेला समुद्रकिनारा असं अप्रतिम दृश्य दिसतं.

बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे काकूंचं घर शोधायला थोडा वेळ लागला ,पण सापडल्यावर एकदम माझ्या जुन्या सगळ्या आठवळी दाटून आल्या.काळानुसार त्या घरात थोडेफार बदल झाले आहेत पण मूळ कोकणी ठसा अजून आहे तसा आहे. थोड फ्रेश होऊन जेवायला बसलो. एकदम साधं असलं तरी इथल्या घरगुती जेवणाला वेगळीच चव असते.अशी तृप्तता आपल्याला १०० रु.खर्च करुनसु्ध्दा.एखाद्या मोठ्या शहरातल्या होटेलात मिळत नाही.जेवण उरकून मग आम्ही नारळाच्या बागेत गप्पा मारायला जाऊन बसलो.बाहेर एवढं उन्हं असूनही तिथे बसल्यावर एकदम थंडगार वाटत होतं. उन्हं थोड उतरल्यावर आम्ही सगळे समुद्रात डुंबायला पळत सुटलो.मोठमोठ्या लाटा
अंगावर घेत कितीही वेळ पाण्यात रहिलं तरी बाहेर यावसचं वाटत नाही आणि मग तिथूनच सूर्यास्त बघण्याची मजा काही औरच असते. वेगवेगळ्या रंगांची उधळण झालेलं ते आकाश बघतच बसावं वाटतं. समुद्रकिनारी बसून अस तासन तास हे सगळं न्याहाळायला मला फार आवडतं.


किंवा समुद्राच्या कडेकडेने जिथे पाणी किनाऱ्याला लागत असतं त्या काठाकाठाने बराच वेळ आपल्याच
विचारांच्या तंद्रीत चालत जायलासुध्दा किंवा नक्षीदार शिंपले शोधून त्यांचा वापर करुन ओलसर
वाळूमध्ये किल्ला करायलासुध्दा.

हा समुद्र इतका मोहावणारा असतो की जगाचा विसरच पडावा. रोजच्या धकाधकीच्या रुटीनमधून चार क्षण बाजूला काढून काढलेली अशी एखदी सहल संजीवनी देते.

अंधार पडू लागल्यावर मग आम्ही परत घराकडे परतू लागलो.घरामागेच समुद्र असल्या्चा फायदा म्हणजे ओले कपडे असले तरी लगेच पळत जाऊन मस्त गरम पाण्याने आंघोळ करता येते. पुन्हा एकदा त्या कोकणी जेवणावर ताव मारुन शेणाने सारवलेल्या अंगणात चटईवर अंग पसरुन आकाशातले चंद्र ,तारे न्याहाळत गप्पा मारत बसलो.

सकाळी उठून आम्ही त्या शांत,प्रदुषणमुक्त वातावरणात फेरफटका मारुन आलो. छोटे छोटे डांबरी रस्ते,रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली कौलारु घरं आणि नारळाच्या बागा, प्रत्येक घराच्या छपरावर वाळत घातलेले नारळ किंवा सुपाऱ्या असा तो परिसर पाहून मन प्रसन्न झालं. कुठेही गडबड नाही आरडाओरडा नाही , सगळं कस निवांत चाललेलं.

कोकणातल्या प्रत्येक ऋतूची स्व:ताची अशी खासियत आहे ,पावसाळ्यात धो धो पाऊस पडेल सगळीकडे चिखल होईल पण तरी एक तजेला आणणारा गारवा हवेमध्ये दरवळत असतो.उन्हाळ्यामधे उकाड्याने जीव हैराण होईल पण मग तेव्हा समुद्रात डुंबायला छान वाटतं.इथली माणसं पण अगदी इथल्या पाण्यासारखी स्वच्छ मनाची असतात. कोकणात आदरातिथ्य फार आहे सगळं कसं एकदम आपुलकीने करतात. इथल्या खाचखळग्यांमुळे,डोंगरातल्या आडवाटांमुळे चालून चालून ही माणसं काटक बनली आहेत. तिकडे अजून एक प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे तिथल्या प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात कसलं तरी फूलं असतचं, भले मग ती गरीब असो ,रानफूलं असेल पण फूलं असतं.

नाश्ता करुन पुन्हा एकदा समुद्रावर भटकायला बाहेर पडलो.तासभर तिथे घालवून डोंगरावर असलेल्या गणपतीमंदिराकडे निघालो.घाटावरुन दिसणारेच दृश्य इथे थोड्या वेगळ्या पध्द्तीने पहायला मिळते.देवाचे
दर्शन घेऊन पुन्हा एकदा लवकरच यायच्या इराद्याने आम्ही आंजर्ल्याचा निरोप घेतला.