Tuesday, April 27, 2010

ढाकचा ट्रेक - एक अविस्मरणीय अनुभव

चार वर्षांपूर्वी आम्ही कॉलेजमध्ये असताना ढाकचा ट्रेक केला होता , पण तेव्हा वर गुहेपर्यंत काही जायचं धाडस झालं नव्हतं. पुन्हा एकदा यावेळी ढाक ला जायचं ठरलं आणि आनंद, भीती दोन्ही मनात दाटल्या. एका गाडीवरून दोघे असे दहाजण लोणावळ्याच्या दिशेने निघालो. मस्त रिकामा रस्ता पाहून अर्धा तास एका गाडीचा ताबा मी घेतला. साधारण संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही जांभिवली या गावात पोचलो. पुण्यापासून साधारण ५०-६० कि.मी. वर आहे हे गाव. याच गावापासून चालायला सुरुवात करायची होती. सूर्य मावळायच्या आत गुहेत पोचणं गरजेचं होतं म्हणून आम्ही गाड्या तिथल्याच एक घरी लावून पिठलं-भाकरीची सोय करून निघालो. आमच्यातील २-३ जण परत येऊन ही पिठलं-भाकरी नेणार होते. उन्हं कमी असल्यामुळे उकाडा तसा जाणवत नव्हता , पण बऱ्याच दिवसात ट्रेक केला नसल्यामुळे दम बराच लागत होता आणि त्यामुळे चालायचा वेगही मंदावत होता.

चालढकल करत ७ च्या सुमारास आम्ही गुहेच्या पायथ्याशी पोचलो. खरी कसोटी तर आता इथून पुढे होती. डोंगरावर असलेल्या दगडांच्या खाचात जागा सापडेल तिथे हाताने पकडत पकडत एक एक पाय पुढे न्यायचा आणि असं थोडं पोटावर झुकून तिरकं चालायचं. अंधार पडल्यामुळे खाली किती खोल दरी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच कळले. :) पण त्यामुळे वाटली असती त्यापेक्षा कमी भीती वाटली. नाहीतर भीतीने गर्भगळीत होऊन मी तिथेच ठाण मांडून बसले असते. तिथून थोड पुढे गेलं की दगडालाच आकार देऊन पायऱ्या केल्या आहेत. आणि मधे मधे आधारासाठी लोखंडी सळ्या लावल्या आहेत.

यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे दोरीच्या सहाय्याने दोन बांबू ठेवले आहेत त्यावरच्या खाचांवर पाय ठेवत वर चढायचं. कमी उंची आणि वजनामुळे मला हा पल्ला फारच त्रासदायक ठरला कारण या लाकडावरच्या खाचा बऱ्याच अंतरावर होत्या. पण आमच्या वानर वंशाच्या मित्रांनी मदत केली आणि एकदाची मी गुहेत पोचले. मनात खूप आनंद आणि त्याच वेळी भीती अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. इतक्या अवघड जागी आलेल्याचा आनंद आणि आता उद्या पुन्हा त्याच वाटेवरून उतरायच कसं याची भीती.

वर २-३ खोल्यांच्या आकाराएवढ्या २ गुहा आहेत. यातील दर्शनीची गुहा म्हणजे भैरोबाचं(शंकराचं)मंदिर आहे.मध्यभागी एक शंकराची पिंड ठेवली आहे, त्याभोवती बरेच त्रिशूल खोवून ठेवले आहेत.तिथेच २ पाण्याची छोटी तळी आहेत ज्यात पावसाचं पाणी साठतं. पाण्याच्या रंगावरूनचं कळलं की जेवण झाल्यावर भांडी इथेच धुतली जात असावीत.इच्छा नसूनही दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला तेच पाणी प्यावं लागलं.इथे वर्षातून एकदा किंवा दोनदा जत्रा भरते.त्यासाठी इथली स्थानिक माणसं जेवणाचं सामान घेऊन येतात, बकरी किंवा कोंबडीचा बळी देतात आणि स्वयंपाक करतात.त्यामुळे बरीच भांडी आणून ठेवलेली दिसतात.एकंदरीत वरची सगळी सोय पहाता तिथल्या लोकांसाठी ही गुहा चढणे म्हणजे एक किरकोळ डोंगर चढण्याइतकी शुल्लक बाब असावी असे वाटले.

दमल्यामुळे भूक नव्हती पण तरी आमच्यातील तिघेजण जेवण आणण्यासाठी परत खाली उतरले.त्यांच्या धाडसाचं खरंच कौतुक वाटलं मला कारण उतरायला परत १ तास आणि चढायला किमान २ तास लागणार होते.इथे एकदा चढेपर्यंतच माझी हालत खराब झाली होती.ते गेल्यावर मग आम्ही बाकीचे गप्पा मारत बसलो. थकव्यामुळे झोप कधी लागली कळलचं नाही. सकाळी आकाशातून एखादं विमान यावं आणि मला घेऊन जावं असंच राहून राहून वाटतं होतं.२ च्या सुमारास जाग आली तेव्हा जेवण घेऊन ते तिघे आले होते. फारशी भूक नसतानाही त्यांनी एवढ्या लांब जाऊन आणलय म्हणून मग सगळे जेवलो आणि मिळेल त्या जागेवर पसरलो.

सकाळी ६ ला जाग आली तेव्हा आपण कुठे आहोत ते कळलं. बाहेरच दृश्य बघून आलो ते बर झालं असं वाटलं.
खूप छान दिसत होता आसपासचा परिसर. कोवळं उन्हं पसरलं होतं सगळीकडे. पण मग माझ्या स्वभावानुसार लगेच आपण खूप उंचीवर आहोत हे लक्षात आलं आणि भीती वाटायला लागली. लवकर लवकर आवरून एक एक जण उतरायला लागला तशी माझ्या छातीतली धडधड वाढत होती

पण दोन काडीपैलवान मित्रांनी(धन्यवाद सनी आणि दिपक) मदत केल्यामुळे चढताना वाटली होती त्यापेक्षा कमी भीती मला उतरताना वाटली. त्यांच्याशिवाय खरोखर अशक्य होत उतरणं. हळूहळू एक-एक टप्पा उतरत उतरत डोंगरावर पोचलो. तर गावकरी आणि ७-८ वर्षांची मुलं गुहेकडे मोठमोठ्ठी लाकडं, जेवणाचं सामान, घेऊन निघालेली दिसली. त्या दिवशी जत्रा होती म्हणून ते सगळे गुहेकडे निघाले होते. इतकी उत्साही दिसत होती ती सगळी आणि पटापटा चढत होती की आम्हाला कौतुक वाटलं. अर्थात त्यांना काही हे फार अवघड नाही.

साधारण १० च्या सुमारास आम्ही गावात पोचलो. मग मस्त भरपूर वडापाव चेपून थोड फ्रेश होऊन पुण्याच्या दिशेने निघलो. लग्नानंतरचा माझा हा पहिलाच ट्रेक आणि तोही इतका अवघड. त्यामुळे मी खूप खूष होते. विश्वासच बसत नव्हता ४ वर्षांपासूनचा गाजलेला ढाकचा ट्रेक मी पूर्ण केला होता.

Tuesday, April 13, 2010

काटकोन त्रिकोण

काल ऑफ़ीस लवकर सुटल्यावर अमेयच्या डोक्यात पिक्चर बघायचा प्लॅन आला. म्हणून मग आम्ही प्रभात ला हुप्पा हुय्या बघायला गेलो. पण चित्रपटगृहात फ़ारशे गर्दी नव्हती. काय करावं कळेना. अचानक अमेयला सकाळी पेपरमध्ये पाहिलेली काटकोन त्रिकोण नाटकाची जाहीरात आठवली. प्रायोगिक नाटक असल्यामुळे आणि त्याबद्द्लचा काहीच रीपोर्ट माहित नसल्यामुळे मी तयार नव्हते. पण फ़क्त डॉ. मोहन आगाशे आहेत म्हणून तो जाऊयाच असं म्हणत होता. शेवटी असंतसं चित्रपटाला काहीच गर्दी नसल्यामुळे मी तयार झाले. (चित्रपट चांगला नसला तर उगाच नंतर शिव्या खायला नकोत हेही एक कारण.) बालगंधर्वला नऊलाच पोचलो. तिकीट काढताना लक्षात आलं ऐंशी नव्वद टक्के तिकीट आधीच संपली आहेत. मग मला बरं वाटलं आणि मी खुशीखुशीत तिकीटे काढली.

नाटकाची एकंदरीत कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फ़िरते. नवरा, बायको आणि सासरे(आबा) एकत्र राहत असतात. नवीन नवीन असताना सुनेचं आणि सासर्‍यांचं छान पटत असतं. पण तिची पार्टटाईमची नोकरी फ़ुल्लटाइम होते आणि मग घरचं वातावरण हळूहळू बदलायला लागतं.स्वयंपाकापासून सगळ्या कामांना बाई लावली जाते. भरमसाट कर्ज काढून बर्‍याच वस्तू घेतल्या जातात. हे त्या जुन्या विचारांच्या आबांना पटत नाही. मग त्यांची आणि सूनेची भांडणं व्ह्यायला लागतात. या सगळ्या प्रकरणात मुलगा त्रयस्तपणे सांगतो. दोघेही त्याला आपलंच कसं बरोबर आहे ते पटवत रहातात. सून आणि सासर्‍यांमधलं अंतर दिवसेंदिवस वाढत जातं. पण एक दिवस अचानक आबा गॅलरीतून पडून त्यांना गंभीर जखम होते. त्यांचा हा अपघात होता का आत्महत्या का खूनाचा प्रयत्न.. या रहस्यावर आधारीत हे नाटक आहे.

नाटकाची सुरुवातच पोलीस अपघाताच्या चौकशीसाठी घरी येण्याने होते. पुढे सारी कथा हळूहळू फ़्लॅशबॅकच्या रुपाने समोर येऊ लागते. हल्लीच्या पिढीच्या एकत्र कुटुंबातील समस्यांवर हे कथानक आधारीत आहे. साधा सरळ सुटसुटीत विषय असूनही पटकथा, मांडणी, दिग्दर्शन आणि अभिनय यांमुळे नाटक एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. पटकथेतील काही मार्मिक संवाद भाव खाऊन जातात आणि त्यामुळे विषय जरी गंभीर असला तरी नाटक कुठेही कंटाळवाणं होत नाही.

भूमितीप्रमाणे काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी इतर दोन बाजूंपेक्षा जास्त असते. त्याप्रमाणे घरातल्या तीन कोपर्‍यांचा विचार करता, सून आणि आबा यांमधील अंतर जास्त होतं. या सार्‍या पार्श्वभूमीवर "काटकोन त्रिकोण" हे नाटकाला दिलेलं नाव साजेसं आहे.

केतकी थत्तेचं हे कदाचित पहिलंच व्यावसायिक नाटक माझ्या ऐकिवात असलेलं पण सूनेच्या भूमिकेत तिने उत्तम अभिनय केला आहे. हल्लीच्या नवविवाहित मुलींची मानसिकता तिने छान रंगवली आहे. नवर्‍याची भूमिका करणारे विवेक बेले हेच नाटकाचे लेखक आहेत. कात्रीत सापडण्याची नवर्‍याची अवस्था, मुलगा म्हणून आपण कमी पडलोय ही भावना, या सर्वांत त्याची होणारी घुसमट आणि यातूनच घरातील परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहण्याची त्याची धारणा हे सारं त्यांच्या अभिनयातून योग्य प्रकारे मांडलं जातं.आणि नाटकाचं ठळक आकर्षण असणारे डॉक्टर मोहन आगाशे हेच पोलीस आणि आबा अशा दुहेरी भूमिकेत आहेत. या दोन्ही भूमिका त्यांनी तितक्याच समर्थपणे आणि फरक लक्षात येईल अशा निभावल्या आहेत. डॉ. मोहन आगाशे यांना प्रत्यक्ष पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ पण त्यांचा अभिनय मनाची पकड लवकर घेतो.

मराठी नाट्यसृष्टीत अजूनही उत्तम नाटकं होतात हे यावरुन सिद्ध होतं. प्रत्येकाने आपल्या घरच्या मंडळींबरोबर एकत्रितपणे बसून बघावं असं हे नाटक आहे असं मी आवर्जून सांगेन. नाटक संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. एक तृप्ततेची भावना सगळ्यांच्या मनात आली आणि एवढ्या चांगल्या नाटकाला आणल्याबद्द्ल मी अमेयचे आभार मानले. बाहेर येऊन आम्ही बराच वेळ नाटकाविषयी चर्चा करत होतो तेव्हा मोहन आगाशे आणि केतकी थत्ते (नाटकाच्याच वेषात) बाहेर आले. एकदम निवांत गप्पा मारत ती टू व्हिलर वरून आणि डॉक्टर आपल्या जुन्या मारुति ८०० मधून निघून गेले.

मराठी माणसं कितीही उंचीवर पोहोचली तरी त्यांना ग्लॅमर भावत नाही आणि ती साधेपणातच सुख मानतात या़चा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आणि त्याच खुषीत आम्ही घरी परतलो.

या नाटकाची एक झलक इथे पहायला मिळेल. http://katkontrikon.blogspot.com/

Friday, April 9, 2010

रोजनिशी
काहीतरी लिहावं वाटतंय पण विषयच सुचत नाही, कुठेतरी सगळं बोलून टाकावं असं काहीसं. पण नक्की काय ? रोज ब्लॉगवर लोक इतकं काय काय लिहीत असतात. मला असं आतून कधीच काही सुचत नाही. आत्तापर्यंत मी फ़क्त प्रवासवर्णनच लिहिलं आहे.. नाही म्हणायला पुन्हा एकदा या वर्षी मी डायरी(दैनंदिनी/रोजनिशी)लिहायला सुरुवात केली आहे. पण ते काय रोज घडेल ते फ़क्त आपल्या शब्दात लिहायचं किंवा मनात आलेले विचार भराभरा डायरीच्या कागदावर उतरवायचे. याची एक गंमत असते पण. आपण जेव्हा अशा जुन्या डायऱ्या वाचतो तेव्हा फार गंम्मत वाटते. लहानपणापासून बाबांना डायरी लिहिताना पाहिलं होतं.त्यांच्या बऱ्याचशा मी वाचल्या पण आहेत. त्यामुळे असेल किंवा कुठेतरी कुणीतरी लिहीलेलं वाचलं होतं बहुतेक( मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली.पुस्तक वाचायचा छंद मला अगदी लहानपणापासून होता. आईकडून ठेवणीत मिळालेला , अनुवांशिकतेतून आलेला हा एकमेव ठेवा.),मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर दोन तीन वर्ष सलग लिहीली. परत बंद पडली, परत सुरु-बंद असा खेळ चालू होता. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा लिहायची तीव्र इच्छा झाली. म्हणून मग यावेळी असंच रोज काय होतंय ते लिहायला लागले. आणि हा प्रयत्न सध्यापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. कधी कधी चार-पाच दिवसांसाठी एकत्र लिहिते तर कधी रोजचं रोज.. पण काहीका असेना माझ्या समाधानासाठी लिहिते आहे हे महत्वाचं.

डायरी लिहायचे दोन फायदे आहेत - एक तर आपल्याला हे सगळं नंतर वाचताना खूप मजा येते आणि दुसरं म्हणजे खरंच मनात येईल ते रिकामं करता येईल अशी एक जागा. इतरांसारख्या मला कधी कविता सुचत नाहीत की साधा लेखही नाही कधी. पण म्हणून मग काहीच लिहू नये का ? मग निदान जे सुचतंय ते तरी लिहावं. मनात तर दर वेळी असंख्य विचारांची गर्दी झालेली असते. दरवेळी ते सगळेच्या सगळे आणि जसेच्या तसे कागदावर उतरतीलच असं नाही. पण काहीच नसण्यापेक्षा थोडंतरी या हेतूनं, काहितरी उतरतं या रोजनिशीमध्ये..

परवा असंच सगळं सामान आवरताना मला आठवीत लिहिलेली डायरी सापडली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. किती वेगळे होतो आपण, काहीही लिहायचो असं वाटलं. कधीतरी मिळणार्‍या दोन-चार रुपयांचं केवढं ते कौतुक असायचं तेव्हा. रोज काय घडलं , कुठे गेलो असं काय काय लिहिलं होतं मी त्यात. खर्चसुद्धा लिहायचे तेव्हा मी. जसं की सायकल मध्ये हवा भरली ५० पैसे. आता कसं वाटतं ना हे वाक्य वाचायला. हल्ली १ रुपयालाच मुळी किंमत नाही तर ५० पैशाची गोष्टच सोडा. आता ५० पैशाचं नाणं फ़क्त वेगवेगळी जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्या लोकांकडेच पहायला मिळतील. :-)

आज आईने काय केलं होतं खायला , कधी झोपलो असंही बरच काही लिहिलं होतं. आता खायच्या आणि झोपायच्या सगळ्याच सवयी बदलल्या आहेत. पूर्वी १ रू ला मिळणारी चटकदार भेळ आता २०-२० रु. देऊनसुद्धा खायला मिळत नाही. त्या वेळच्या चैनीच्या गोष्टी म्हणजे काय तर रंकाळ्यावर चालत फिरायला जाणे, तिथे जाऊन भेळ खाणे किंवा फार फार तर आईस्क्रिम खाणे. पण हल्ली हे सगळं दुर्मिळ झालं आहे आणि त्याची जागा मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या ५० रु. च्या पॉपकॉर्नने घेतली आहे. असो.

काही का असेना या आणि अशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला रोजनिशी सारखी एखादी संजीवनी गाठीशी हवीच. म्हणून मला वाटतं प्रत्येकाने आपल्या बिझी रुटीनमधून थोडा तरी वेळ काढून रोजनिशी निद्राधीन व्हायच्या आत लिहिली पाहिजे