Tuesday, November 23, 2010

तोरणा ! छत्रपती शिवाजीमहाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर केलेला पहिला गड.

तोरणा! छत्रपती शिवाजीमहाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर केलेला पहिला गड. स्वराज्याच्या तोरणातील पहिला मणी!स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्याने रोवली तो हा तोरणा. मला अजूनही तो धडा आठवतोय ज्यामध्ये महाराज आणि मॉंसाहेब हिंदवी स्वराज्याविषयी बोलत आहेत आणि त्यांना समोर दिसतो तो हा तोरणा!रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा किल्ला कसा सर करता येईल याचे मनसुबे रचले जात आहेत.

गेली चार वर्ष मी पुण्यात वास्तव्याला (जुन्या काळाविषयी बोलायला लागलं की असे शब्द आपोआप डोक्यात येतात ना ?:)) आहे,पण जायचा योगच येत नव्हता.कारण पाऊस असल्याशिवाय तोरण्याला जाण्यात मजा नाही हे आमच्या आधी जाऊन आलेल्या मित्रमंडळींनी मनावर पक्कं बिंबवलेलं.आणि राजगडासारखं तिकडे बघण्यासारखं फार काही नाही हे ऐकिवात होतं. यावर्षी जून महिन्यात मोसमी वाऱ्यांनी आपली हजेरी लावायला सुरुवात केली आणि आमचा निघायचा बेत पक्का झाला.सकाळी सात वाजता निघायचं ठरवूनही नऊ वाजता न्याहारी करून आमची गाडी तोरण्याकडे निघाली.साधारण १०.१५ च्या सुमारास

गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हा या गावी पोचलो.पुन्हा एकदा खाण्यापिण्याचा कार्यक्रम उरकून मंडळींनी चढायला सुरुवात केली.नुकताच पावसाळा सुरु झाला होता, त्यामुळे चहुकडे हिरवीगार शेतं, पेरणी करणारे शेतकरी, नांगराला जुंपलेले बैल असं चित्र पहायला मिळालं. धुंद करणारा मातीचा वास. अहाहा. पावसाळ्यतलं धरणीमातेचं रुप काही औरचं असतं. मात्र भरपूर पाऊस न पडल्यामुळे धबधबे काही दिसले नाहीत.चालायला सुरुवात केली तेव्हा गड फार काही मोठठा आणि उंच वाटत नव्हता, कारण ढगांनी त्याला कडं केलं होतं.वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पठारासारख्या दोन जागा आहेत.तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. त्याकाळी अशाच जागा शत्रुवर नजर ठेवायला कामी येत असणार.अजूनही ढगांची दाटी होती त्यामुळे शिखर दिसत नव्हते आणि अजून गड किती लांब आहे याचा अंदाजही येत नव्हता.दोन तास झाले तरी प्रवेशद्वार काही दिसेना,धीर थोडा सुटत चालला होता.प्रवेशद्वारापूर्वीचा शेवटचा टप्पा थोडा अवघड आहे.रेलींगला पकडून मोठमोठ्या उंचीच्या दगडांना पकडत चढावं लागतं.एवढ्या उंचीवर सामान न घेता चढायची मारामार असताना कोणी इथे येऊन रेलींग लावली त्यांचे मी मनोमन आभार मानले.या गडाचं नाव महाराजांनी प्रचंडगड का ठेवलं असेल याची प्रचिती त्यावेळी आली. तिथून झाडाझुडपातून जाण्याऱ्या वाटेत एकमेव सापडलेल्या धबधब्यात भिजण्याची मजा लुटली.

शेवटी १.३० च्या सुमारास महाद्वारापाशी पोचलो.सुट्टीचा दिवस असल्यामुळॆ बरीच गर्दी होती.महाद्वारापुढे थोडं चालल्यावर एक शेडवजा घर दिसलं.तिथे मस्त चहा-पोह्यावर ताव मारला आणि खालून बांधून आणलेलं जेवण तोरणाई देवीच्या मंदिर परिसरात फस्त केलं.पाऊस आणि ढगांमुळे लांबचं फार काही दिसत नव्हतं आणि आम्ही दमलोही होतो त्यामुळे गड फिरायचा विचार रद्द करुन उतरायला सुरुवात केली.

परत आल्यावर पायांची हालत खराब झाली होती.ेकदाचित सारखे ट्रेक करत राहिलं पाहिजे (म्हणजे त्यांना सवय होईल आणि ते दुखणार नाहीत)हेचं तर सुचवत नसतील ना ते ? ;)

ता.क.- हा ट्रेक पावसाळी वातावरण किंवा पाऊस असेल तर एका दिवसात करता येण्यासारखा आहे.वस्तीसाठीसुद्धा देवळात भरपूर जागा आहे.

Tuesday, April 27, 2010

ढाकचा ट्रेक - एक अविस्मरणीय अनुभव

चार वर्षांपूर्वी आम्ही कॉलेजमध्ये असताना ढाकचा ट्रेक केला होता , पण तेव्हा वर गुहेपर्यंत काही जायचं धाडस झालं नव्हतं. पुन्हा एकदा यावेळी ढाक ला जायचं ठरलं आणि आनंद, भीती दोन्ही मनात दाटल्या. एका गाडीवरून दोघे असे दहाजण लोणावळ्याच्या दिशेने निघालो. मस्त रिकामा रस्ता पाहून अर्धा तास एका गाडीचा ताबा मी घेतला. साधारण संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही जांभिवली या गावात पोचलो. पुण्यापासून साधारण ५०-६० कि.मी. वर आहे हे गाव. याच गावापासून चालायला सुरुवात करायची होती. सूर्य मावळायच्या आत गुहेत पोचणं गरजेचं होतं म्हणून आम्ही गाड्या तिथल्याच एक घरी लावून पिठलं-भाकरीची सोय करून निघालो. आमच्यातील २-३ जण परत येऊन ही पिठलं-भाकरी नेणार होते. उन्हं कमी असल्यामुळे उकाडा तसा जाणवत नव्हता , पण बऱ्याच दिवसात ट्रेक केला नसल्यामुळे दम बराच लागत होता आणि त्यामुळे चालायचा वेगही मंदावत होता.

चालढकल करत ७ च्या सुमारास आम्ही गुहेच्या पायथ्याशी पोचलो. खरी कसोटी तर आता इथून पुढे होती. डोंगरावर असलेल्या दगडांच्या खाचात जागा सापडेल तिथे हाताने पकडत पकडत एक एक पाय पुढे न्यायचा आणि असं थोडं पोटावर झुकून तिरकं चालायचं. अंधार पडल्यामुळे खाली किती खोल दरी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच कळले. :) पण त्यामुळे वाटली असती त्यापेक्षा कमी भीती वाटली. नाहीतर भीतीने गर्भगळीत होऊन मी तिथेच ठाण मांडून बसले असते. तिथून थोड पुढे गेलं की दगडालाच आकार देऊन पायऱ्या केल्या आहेत. आणि मधे मधे आधारासाठी लोखंडी सळ्या लावल्या आहेत.

यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे दोरीच्या सहाय्याने दोन बांबू ठेवले आहेत त्यावरच्या खाचांवर पाय ठेवत वर चढायचं. कमी उंची आणि वजनामुळे मला हा पल्ला फारच त्रासदायक ठरला कारण या लाकडावरच्या खाचा बऱ्याच अंतरावर होत्या. पण आमच्या वानर वंशाच्या मित्रांनी मदत केली आणि एकदाची मी गुहेत पोचले. मनात खूप आनंद आणि त्याच वेळी भीती अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. इतक्या अवघड जागी आलेल्याचा आनंद आणि आता उद्या पुन्हा त्याच वाटेवरून उतरायच कसं याची भीती.

वर २-३ खोल्यांच्या आकाराएवढ्या २ गुहा आहेत. यातील दर्शनीची गुहा म्हणजे भैरोबाचं(शंकराचं)मंदिर आहे.मध्यभागी एक शंकराची पिंड ठेवली आहे, त्याभोवती बरेच त्रिशूल खोवून ठेवले आहेत.तिथेच २ पाण्याची छोटी तळी आहेत ज्यात पावसाचं पाणी साठतं. पाण्याच्या रंगावरूनचं कळलं की जेवण झाल्यावर भांडी इथेच धुतली जात असावीत.इच्छा नसूनही दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला तेच पाणी प्यावं लागलं.इथे वर्षातून एकदा किंवा दोनदा जत्रा भरते.त्यासाठी इथली स्थानिक माणसं जेवणाचं सामान घेऊन येतात, बकरी किंवा कोंबडीचा बळी देतात आणि स्वयंपाक करतात.त्यामुळे बरीच भांडी आणून ठेवलेली दिसतात.एकंदरीत वरची सगळी सोय पहाता तिथल्या लोकांसाठी ही गुहा चढणे म्हणजे एक किरकोळ डोंगर चढण्याइतकी शुल्लक बाब असावी असे वाटले.

दमल्यामुळे भूक नव्हती पण तरी आमच्यातील तिघेजण जेवण आणण्यासाठी परत खाली उतरले.त्यांच्या धाडसाचं खरंच कौतुक वाटलं मला कारण उतरायला परत १ तास आणि चढायला किमान २ तास लागणार होते.इथे एकदा चढेपर्यंतच माझी हालत खराब झाली होती.ते गेल्यावर मग आम्ही बाकीचे गप्पा मारत बसलो. थकव्यामुळे झोप कधी लागली कळलचं नाही. सकाळी आकाशातून एखादं विमान यावं आणि मला घेऊन जावं असंच राहून राहून वाटतं होतं.२ च्या सुमारास जाग आली तेव्हा जेवण घेऊन ते तिघे आले होते. फारशी भूक नसतानाही त्यांनी एवढ्या लांब जाऊन आणलय म्हणून मग सगळे जेवलो आणि मिळेल त्या जागेवर पसरलो.

सकाळी ६ ला जाग आली तेव्हा आपण कुठे आहोत ते कळलं. बाहेरच दृश्य बघून आलो ते बर झालं असं वाटलं.
खूप छान दिसत होता आसपासचा परिसर. कोवळं उन्हं पसरलं होतं सगळीकडे. पण मग माझ्या स्वभावानुसार लगेच आपण खूप उंचीवर आहोत हे लक्षात आलं आणि भीती वाटायला लागली. लवकर लवकर आवरून एक एक जण उतरायला लागला तशी माझ्या छातीतली धडधड वाढत होती

पण दोन काडीपैलवान मित्रांनी(धन्यवाद सनी आणि दिपक) मदत केल्यामुळे चढताना वाटली होती त्यापेक्षा कमी भीती मला उतरताना वाटली. त्यांच्याशिवाय खरोखर अशक्य होत उतरणं. हळूहळू एक-एक टप्पा उतरत उतरत डोंगरावर पोचलो. तर गावकरी आणि ७-८ वर्षांची मुलं गुहेकडे मोठमोठ्ठी लाकडं, जेवणाचं सामान, घेऊन निघालेली दिसली. त्या दिवशी जत्रा होती म्हणून ते सगळे गुहेकडे निघाले होते. इतकी उत्साही दिसत होती ती सगळी आणि पटापटा चढत होती की आम्हाला कौतुक वाटलं. अर्थात त्यांना काही हे फार अवघड नाही.

साधारण १० च्या सुमारास आम्ही गावात पोचलो. मग मस्त भरपूर वडापाव चेपून थोड फ्रेश होऊन पुण्याच्या दिशेने निघलो. लग्नानंतरचा माझा हा पहिलाच ट्रेक आणि तोही इतका अवघड. त्यामुळे मी खूप खूष होते. विश्वासच बसत नव्हता ४ वर्षांपासूनचा गाजलेला ढाकचा ट्रेक मी पूर्ण केला होता.

Tuesday, April 13, 2010

काटकोन त्रिकोण

काल ऑफ़ीस लवकर सुटल्यावर अमेयच्या डोक्यात पिक्चर बघायचा प्लॅन आला. म्हणून मग आम्ही प्रभात ला हुप्पा हुय्या बघायला गेलो. पण चित्रपटगृहात फ़ारशे गर्दी नव्हती. काय करावं कळेना. अचानक अमेयला सकाळी पेपरमध्ये पाहिलेली काटकोन त्रिकोण नाटकाची जाहीरात आठवली. प्रायोगिक नाटक असल्यामुळे आणि त्याबद्द्लचा काहीच रीपोर्ट माहित नसल्यामुळे मी तयार नव्हते. पण फ़क्त डॉ. मोहन आगाशे आहेत म्हणून तो जाऊयाच असं म्हणत होता. शेवटी असंतसं चित्रपटाला काहीच गर्दी नसल्यामुळे मी तयार झाले. (चित्रपट चांगला नसला तर उगाच नंतर शिव्या खायला नकोत हेही एक कारण.) बालगंधर्वला नऊलाच पोचलो. तिकीट काढताना लक्षात आलं ऐंशी नव्वद टक्के तिकीट आधीच संपली आहेत. मग मला बरं वाटलं आणि मी खुशीखुशीत तिकीटे काढली.

नाटकाची एकंदरीत कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फ़िरते. नवरा, बायको आणि सासरे(आबा) एकत्र राहत असतात. नवीन नवीन असताना सुनेचं आणि सासर्‍यांचं छान पटत असतं. पण तिची पार्टटाईमची नोकरी फ़ुल्लटाइम होते आणि मग घरचं वातावरण हळूहळू बदलायला लागतं.स्वयंपाकापासून सगळ्या कामांना बाई लावली जाते. भरमसाट कर्ज काढून बर्‍याच वस्तू घेतल्या जातात. हे त्या जुन्या विचारांच्या आबांना पटत नाही. मग त्यांची आणि सूनेची भांडणं व्ह्यायला लागतात. या सगळ्या प्रकरणात मुलगा त्रयस्तपणे सांगतो. दोघेही त्याला आपलंच कसं बरोबर आहे ते पटवत रहातात. सून आणि सासर्‍यांमधलं अंतर दिवसेंदिवस वाढत जातं. पण एक दिवस अचानक आबा गॅलरीतून पडून त्यांना गंभीर जखम होते. त्यांचा हा अपघात होता का आत्महत्या का खूनाचा प्रयत्न.. या रहस्यावर आधारीत हे नाटक आहे.

नाटकाची सुरुवातच पोलीस अपघाताच्या चौकशीसाठी घरी येण्याने होते. पुढे सारी कथा हळूहळू फ़्लॅशबॅकच्या रुपाने समोर येऊ लागते. हल्लीच्या पिढीच्या एकत्र कुटुंबातील समस्यांवर हे कथानक आधारीत आहे. साधा सरळ सुटसुटीत विषय असूनही पटकथा, मांडणी, दिग्दर्शन आणि अभिनय यांमुळे नाटक एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. पटकथेतील काही मार्मिक संवाद भाव खाऊन जातात आणि त्यामुळे विषय जरी गंभीर असला तरी नाटक कुठेही कंटाळवाणं होत नाही.

भूमितीप्रमाणे काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी इतर दोन बाजूंपेक्षा जास्त असते. त्याप्रमाणे घरातल्या तीन कोपर्‍यांचा विचार करता, सून आणि आबा यांमधील अंतर जास्त होतं. या सार्‍या पार्श्वभूमीवर "काटकोन त्रिकोण" हे नाटकाला दिलेलं नाव साजेसं आहे.

केतकी थत्तेचं हे कदाचित पहिलंच व्यावसायिक नाटक माझ्या ऐकिवात असलेलं पण सूनेच्या भूमिकेत तिने उत्तम अभिनय केला आहे. हल्लीच्या नवविवाहित मुलींची मानसिकता तिने छान रंगवली आहे. नवर्‍याची भूमिका करणारे विवेक बेले हेच नाटकाचे लेखक आहेत. कात्रीत सापडण्याची नवर्‍याची अवस्था, मुलगा म्हणून आपण कमी पडलोय ही भावना, या सर्वांत त्याची होणारी घुसमट आणि यातूनच घरातील परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहण्याची त्याची धारणा हे सारं त्यांच्या अभिनयातून योग्य प्रकारे मांडलं जातं.आणि नाटकाचं ठळक आकर्षण असणारे डॉक्टर मोहन आगाशे हेच पोलीस आणि आबा अशा दुहेरी भूमिकेत आहेत. या दोन्ही भूमिका त्यांनी तितक्याच समर्थपणे आणि फरक लक्षात येईल अशा निभावल्या आहेत. डॉ. मोहन आगाशे यांना प्रत्यक्ष पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ पण त्यांचा अभिनय मनाची पकड लवकर घेतो.

मराठी नाट्यसृष्टीत अजूनही उत्तम नाटकं होतात हे यावरुन सिद्ध होतं. प्रत्येकाने आपल्या घरच्या मंडळींबरोबर एकत्रितपणे बसून बघावं असं हे नाटक आहे असं मी आवर्जून सांगेन. नाटक संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. एक तृप्ततेची भावना सगळ्यांच्या मनात आली आणि एवढ्या चांगल्या नाटकाला आणल्याबद्द्ल मी अमेयचे आभार मानले. बाहेर येऊन आम्ही बराच वेळ नाटकाविषयी चर्चा करत होतो तेव्हा मोहन आगाशे आणि केतकी थत्ते (नाटकाच्याच वेषात) बाहेर आले. एकदम निवांत गप्पा मारत ती टू व्हिलर वरून आणि डॉक्टर आपल्या जुन्या मारुति ८०० मधून निघून गेले.

मराठी माणसं कितीही उंचीवर पोहोचली तरी त्यांना ग्लॅमर भावत नाही आणि ती साधेपणातच सुख मानतात या़चा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आणि त्याच खुषीत आम्ही घरी परतलो.

या नाटकाची एक झलक इथे पहायला मिळेल. http://katkontrikon.blogspot.com/

Friday, April 9, 2010

रोजनिशी




काहीतरी लिहावं वाटतंय पण विषयच सुचत नाही, कुठेतरी सगळं बोलून टाकावं असं काहीसं. पण नक्की काय ? रोज ब्लॉगवर लोक इतकं काय काय लिहीत असतात. मला असं आतून कधीच काही सुचत नाही. आत्तापर्यंत मी फ़क्त प्रवासवर्णनच लिहिलं आहे.. नाही म्हणायला पुन्हा एकदा या वर्षी मी डायरी(दैनंदिनी/रोजनिशी)लिहायला सुरुवात केली आहे. पण ते काय रोज घडेल ते फ़क्त आपल्या शब्दात लिहायचं किंवा मनात आलेले विचार भराभरा डायरीच्या कागदावर उतरवायचे. याची एक गंमत असते पण. आपण जेव्हा अशा जुन्या डायऱ्या वाचतो तेव्हा फार गंम्मत वाटते. लहानपणापासून बाबांना डायरी लिहिताना पाहिलं होतं.त्यांच्या बऱ्याचशा मी वाचल्या पण आहेत. त्यामुळे असेल किंवा कुठेतरी कुणीतरी लिहीलेलं वाचलं होतं बहुतेक( मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली.पुस्तक वाचायचा छंद मला अगदी लहानपणापासून होता. आईकडून ठेवणीत मिळालेला , अनुवांशिकतेतून आलेला हा एकमेव ठेवा.),मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर दोन तीन वर्ष सलग लिहीली. परत बंद पडली, परत सुरु-बंद असा खेळ चालू होता. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा लिहायची तीव्र इच्छा झाली. म्हणून मग यावेळी असंच रोज काय होतंय ते लिहायला लागले. आणि हा प्रयत्न सध्यापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. कधी कधी चार-पाच दिवसांसाठी एकत्र लिहिते तर कधी रोजचं रोज.. पण काहीका असेना माझ्या समाधानासाठी लिहिते आहे हे महत्वाचं.

डायरी लिहायचे दोन फायदे आहेत - एक तर आपल्याला हे सगळं नंतर वाचताना खूप मजा येते आणि दुसरं म्हणजे खरंच मनात येईल ते रिकामं करता येईल अशी एक जागा. इतरांसारख्या मला कधी कविता सुचत नाहीत की साधा लेखही नाही कधी. पण म्हणून मग काहीच लिहू नये का ? मग निदान जे सुचतंय ते तरी लिहावं. मनात तर दर वेळी असंख्य विचारांची गर्दी झालेली असते. दरवेळी ते सगळेच्या सगळे आणि जसेच्या तसे कागदावर उतरतीलच असं नाही. पण काहीच नसण्यापेक्षा थोडंतरी या हेतूनं, काहितरी उतरतं या रोजनिशीमध्ये..

परवा असंच सगळं सामान आवरताना मला आठवीत लिहिलेली डायरी सापडली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. किती वेगळे होतो आपण, काहीही लिहायचो असं वाटलं. कधीतरी मिळणार्‍या दोन-चार रुपयांचं केवढं ते कौतुक असायचं तेव्हा. रोज काय घडलं , कुठे गेलो असं काय काय लिहिलं होतं मी त्यात. खर्चसुद्धा लिहायचे तेव्हा मी. जसं की सायकल मध्ये हवा भरली ५० पैसे. आता कसं वाटतं ना हे वाक्य वाचायला. हल्ली १ रुपयालाच मुळी किंमत नाही तर ५० पैशाची गोष्टच सोडा. आता ५० पैशाचं नाणं फ़क्त वेगवेगळी जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्या लोकांकडेच पहायला मिळतील. :-)

आज आईने काय केलं होतं खायला , कधी झोपलो असंही बरच काही लिहिलं होतं. आता खायच्या आणि झोपायच्या सगळ्याच सवयी बदलल्या आहेत. पूर्वी १ रू ला मिळणारी चटकदार भेळ आता २०-२० रु. देऊनसुद्धा खायला मिळत नाही. त्या वेळच्या चैनीच्या गोष्टी म्हणजे काय तर रंकाळ्यावर चालत फिरायला जाणे, तिथे जाऊन भेळ खाणे किंवा फार फार तर आईस्क्रिम खाणे. पण हल्ली हे सगळं दुर्मिळ झालं आहे आणि त्याची जागा मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या ५० रु. च्या पॉपकॉर्नने घेतली आहे. असो.

काही का असेना या आणि अशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला रोजनिशी सारखी एखादी संजीवनी गाठीशी हवीच. म्हणून मला वाटतं प्रत्येकाने आपल्या बिझी रुटीनमधून थोडा तरी वेळ काढून रोजनिशी निद्राधीन व्हायच्या आत लिहिली पाहिजे

Tuesday, October 6, 2009

आंजर्ले


कोकण! निळाक्षार समुद्र,संध्याकाळी समोर दिसणारा सूर्य आणि त्याचे आकाशात पसरलेले विविधरंगी किरण, समुद्रकिनारी पसरलेली मऊ वाळू,वाळू जिथे संपते तिथून सुरु होणारी नारळा-पोफळीची, केळ्याची बाग, या बागेत पाटात सोडलेलं पाणी, बाग संपल्यावर एका बाजूला असलेला गाई म्हशींचा गोठा ,त्याला लागून असलेलं कौलारु घर,घराच्या सोप्यामध्ये असलेला लांबलचक झोपाळा ,घरासमोरचं मोठ्ठं अंगण. अहाहा. नुसतं कोकण म्हटलं कि या एका शब्दावर हे सगळं चित्र कायम माझ्या डोळ्यासमोर उभ रहातं.

माझे बावा कृषि अधिकारी असल्यामुळे सतत फिरतीची नोकरी असायची.मी लहान असताना १ली ते ५वी आम्ही रत्नागिरीला होतो.लहानपणची ५ वर्षे कोकणात गेल्यामुळे मला कोकणाविषयी विशेष प्रेम आहे.त्या वेळी तिथला जवळपासचा सगळा भाग आम्ही पालथा घातला होता. प्रत्येक वेळी कोणी नवीन पाहुणा आम्हाला भेटायला रत्नागिरीला आला की आम्ही त्याला काही ठराविक ठिकाणी घेऊन जायचो,जसं पावस ,गणपतीपुळे, हरिहरेश्वर आणि आंजर्ले. त्या बऱ्याच ठिकाणांपैकी माझ्या स्मरणात कायम घर करुन राहिलेलं आणि मला परत परत जायची इच्छा होणारं गाव म्हणजे आंजर्ले. बाबांच्या ओळखीच्या एक काकू आहेत दांडेकर काकू,दर वेळी आम्ही तिथेच उतरायचो.त्यांच्या घराचा परिसर म्हणजेच माझ्या मनावर कोरलेलं कोकणाच ते चित्र आहे.

या वेळी बऱ्याच म्हणजे जवळपास १०-१२ वर्षांनी पुन्हा एकदा तिकडे जायचं ठरवलं.आमचा कंपू कोकणात जायच आणि समुद्रात भिजायचं म्हटल्यावर एका पायावर तयार झाला.७-८ जणांसाठी सुमो बुक करुन आम्ही आंजर्ल्याच्या दिशेने निघालो. नेहमीप्रमाणेच गाडी मध्ये दंगा,गाणी,गप्पांमुळे ५ तास प्रवासाचा वेळ कसा गेला ते कळलचं नाही.गावाकडे घाटावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन संपूर्ण गाव दिसतं.खरं तर गाव दिसतच नाही कारण सगळी घर नारळाच्या गर्द हिरव्या झाडीत लपली आहेत आणि ती हिरवाई संपली की त्यालगत असलेला दूरवर पसरलेला समुद्रकिनारा असं अप्रतिम दृश्य दिसतं.

बऱ्याच वर्षांनी आल्यामुळे काकूंचं घर शोधायला थोडा वेळ लागला ,पण सापडल्यावर एकदम माझ्या जुन्या सगळ्या आठवळी दाटून आल्या.काळानुसार त्या घरात थोडेफार बदल झाले आहेत पण मूळ कोकणी ठसा अजून आहे तसा आहे. थोड फ्रेश होऊन जेवायला बसलो. एकदम साधं असलं तरी इथल्या घरगुती जेवणाला वेगळीच चव असते.अशी तृप्तता आपल्याला १०० रु.खर्च करुनसु्ध्दा.एखाद्या मोठ्या शहरातल्या होटेलात मिळत नाही.जेवण उरकून मग आम्ही नारळाच्या बागेत गप्पा मारायला जाऊन बसलो.बाहेर एवढं उन्हं असूनही तिथे बसल्यावर एकदम थंडगार वाटत होतं. उन्हं थोड उतरल्यावर आम्ही सगळे समुद्रात डुंबायला पळत सुटलो.मोठमोठ्या लाटा
अंगावर घेत कितीही वेळ पाण्यात रहिलं तरी बाहेर यावसचं वाटत नाही आणि मग तिथूनच सूर्यास्त बघण्याची मजा काही औरच असते. वेगवेगळ्या रंगांची उधळण झालेलं ते आकाश बघतच बसावं वाटतं. समुद्रकिनारी बसून अस तासन तास हे सगळं न्याहाळायला मला फार आवडतं.


किंवा समुद्राच्या कडेकडेने जिथे पाणी किनाऱ्याला लागत असतं त्या काठाकाठाने बराच वेळ आपल्याच
विचारांच्या तंद्रीत चालत जायलासुध्दा किंवा नक्षीदार शिंपले शोधून त्यांचा वापर करुन ओलसर
वाळूमध्ये किल्ला करायलासुध्दा.

हा समुद्र इतका मोहावणारा असतो की जगाचा विसरच पडावा. रोजच्या धकाधकीच्या रुटीनमधून चार क्षण बाजूला काढून काढलेली अशी एखदी सहल संजीवनी देते.

अंधार पडू लागल्यावर मग आम्ही परत घराकडे परतू लागलो.घरामागेच समुद्र असल्या्चा फायदा म्हणजे ओले कपडे असले तरी लगेच पळत जाऊन मस्त गरम पाण्याने आंघोळ करता येते. पुन्हा एकदा त्या कोकणी जेवणावर ताव मारुन शेणाने सारवलेल्या अंगणात चटईवर अंग पसरुन आकाशातले चंद्र ,तारे न्याहाळत गप्पा मारत बसलो.

सकाळी उठून आम्ही त्या शांत,प्रदुषणमुक्त वातावरणात फेरफटका मारुन आलो. छोटे छोटे डांबरी रस्ते,रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली कौलारु घरं आणि नारळाच्या बागा, प्रत्येक घराच्या छपरावर वाळत घातलेले नारळ किंवा सुपाऱ्या असा तो परिसर पाहून मन प्रसन्न झालं. कुठेही गडबड नाही आरडाओरडा नाही , सगळं कस निवांत चाललेलं.

कोकणातल्या प्रत्येक ऋतूची स्व:ताची अशी खासियत आहे ,पावसाळ्यात धो धो पाऊस पडेल सगळीकडे चिखल होईल पण तरी एक तजेला आणणारा गारवा हवेमध्ये दरवळत असतो.उन्हाळ्यामधे उकाड्याने जीव हैराण होईल पण मग तेव्हा समुद्रात डुंबायला छान वाटतं.इथली माणसं पण अगदी इथल्या पाण्यासारखी स्वच्छ मनाची असतात. कोकणात आदरातिथ्य फार आहे सगळं कसं एकदम आपुलकीने करतात. इथल्या खाचखळग्यांमुळे,डोंगरातल्या आडवाटांमुळे चालून चालून ही माणसं काटक बनली आहेत. तिकडे अजून एक प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे तिथल्या प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात कसलं तरी फूलं असतचं, भले मग ती गरीब असो ,रानफूलं असेल पण फूलं असतं.

नाश्ता करुन पुन्हा एकदा समुद्रावर भटकायला बाहेर पडलो.तासभर तिथे घालवून डोंगरावर असलेल्या गणपतीमंदिराकडे निघालो.घाटावरुन दिसणारेच दृश्य इथे थोड्या वेगळ्या पध्द्तीने पहायला मिळते.



देवाचे
दर्शन घेऊन पुन्हा एकदा लवकरच यायच्या इराद्याने आम्ही आंजर्ल्याचा निरोप घेतला.