Monday, October 15, 2012

लहानपण देगा देवा...

आज कालच्या धावपळीच्या जगात स्व:ताला द्यायला आपल्याकडे फार कमी वेळ  असतो. मग एखाद्या वेळी कुठल्या लहान मुलाला खेळताना किंवा रडताना पाहिलं कि मला माझ्या लहानपणीची आठवण हमखास येते. किती सुंदर होते ते दिवस...ना तेंव्हा पैशाच्या मागे धावायला लागायचं ना वेळेच्या.... मस्त आरामात, स्वछंदी  जगता येत होत...मनाला वाटेल तसं पाहिजे तिथे हिंडता बागडता  येत  होत .हां  आता  तेंव्हा  आपल्याला  पाहिजे  ती  वस्तू  त्याची  किंमत  मोजून  खरेदी  करता  येत  नव्हती पण  बाबांकडून  परवानगी  मागून  खर्च  करण्यातसुद्धा  एक वेगळीच मजा असायची आणि मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची त्यामुळे किंमत असायची....

स्वत:  कमवायला लागल्यापासून असं काही राहिलाच नाही, सगळ तर पाहिजे तेंव्हा विकत  घेता  येत आता   कधीही ... पण फक्त वाढदिवसाला आणि दिवाळीला असे वर्षातून दोन वेळलाच मिळणाऱ्या कपड्यांमधला आनंद आता  महिन्याला चार चार कपडे घेतले तरी का येत नाही ? किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद लुटता येत होता तेंव्हा... पार्टी  करायला एक १  रुपयासुद्धा पुरेसा  असायचा. आठ आण्याची  भेल , चार आण्याचा  गोळा  आणि चार आण्याची चिक्की...

पाहुणे  आले  घरी  कि  त्यांनी  दिलेल्या  पैशांनी खारुताईमध्ये (आजकालची  piggy bank) ते पैसे टाकायचे  आणि मग असेच भरपूर पैसे साठले कि ते परत परत मोजून त्यातून काय घेता येईल याचा विचार करत  बसायचं . आता हातात मिळणारे पैसे वाढले असले तरी त्यातून खरेदी करता येणारा आनंद त्या तुलनेत   कमी झाला आहे.

माझं आजोळ कर्नाटकात निपाणी या गावचं. तिथे आमच्या पणजोबांच्या काळातला मोठा वाडा आहे १७  खोल्यांचा दुमजली. आमच्याकडे  ४  खोल्या  आणि  बाकी  मग भाडेकरूना राहायला दिलेल्या. त्या  वाडयाला  ५  न्हाणीघर आहेत. लपाछपी खेळताना अशा जागा खास उपयोगी पडायच्या. वर्षातून किमान २ वेळा तरी आम्ही आजोळी जायचो. वाड्याच्या बाहेर रिक्षा थांबली कि पळत पळत जाऊन वाड्याचे दार उघडले  कि  आज्जी  आजोबांच्या  चेहऱ्यावर  ओसंडून  वाहणारा  आनंद अजूनही तसाच आठवतो आहे मला.  त्यांना  नमस्कार करून मग घरभर भटकून मागच्या वेळी काय नव्हत किंवा आता नवीन काही दिसतंय का  ते  पहायचो. मग  आजोबाना  (आम्ही  त्यांना  आबा  म्हणतो ) झोपाळा जोडायच्या  कामावर  नेमून  आज्जी  काय  खायला  देते  त्यावर  नजर. एकदा  का  झोपाळा  लागला  कि  त्यावर  बसून  मोठमोठ्याने  झोके घेणे, आत स्वयंपाकघरात खाण्यापिण्याच्या ऑर्डरी सोडणे आणि  मग  गप्पा  कुटणे ... यातली  मजा  काही  औरच  होती. त्यावेळी वाड्यात बरीच मुलमुली आमच्या वयाच्या असल्यामुळे  त्यांच्यासोबत आम्ही सगळी मावस भावंड मिळून खूप दंगा करायचो.  काचाकवड्या, पत्ते, शिवाजी म्हणतो पळा पळा, टिपीटिपी टिपटॉप, लगोरी,  लंगडी पळती असे काय काय खेळ खेळायचो. पत्त्यामाधला  not at home हा  डाव  खेळताना तर आपले पत्ते दिसू नयेत म्हणून कुठे कुठे  पळायचो. मला  वाचनाची  आवड  माझ्या  आई आणि आज्जी आजोबांमुळे  लागली. आजोबा शिक्षक असल्यामुळे आणि मुळातच त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे आजोळी खूप पुस्तक जपून ठेवली  आहेत. लहानपणी मी पंचतंत्राच्या गोष्टी अगदी पुरवून पुरवून वाचायचे. कारण एकाच दिवशी भरपूर गोष्टी वाचल्या तर सुट्टी संपायच्या आतच सगळ पुस्तक संपेल आणि मग परत कुठल लहान मुलांच पुस्तक लवकर सापडणार नाही, कारण लहान मुलांची वाचायची पुस्तक फार कमी होती.

आम्ही सगळे सकाळी लवकर उठायचो, मग वाड्यातच असलेल्या विहिरीवरून पाणी काढण्यासाठी आमची चढाओढ असायची. ते झालं कि चुलीवर पाणी तपावायालो बसायचो. आबा आम्हाला जुन्या पेपरची रद्दी किंवा जुनी पत्र द्यायचे. मी तर प्रत्येक पत्र वाचून मगच ते जाळायचे. फार गमतीदार पत्र असायची ती. आत्ताच्या e-mail च्या जमान्यात हे सगळ खूप दुर्मिळ झालंय.

बैठकीच्या खोलीत एक  ठोक्याचं घड्याळ आहे, दर  तासाला त्याचे टोले पडायचे. ठोके पडायला  लागले  कि  जिथे  असेल  तिथून  पळून  येऊन मी  ते मोजायचे. आमच्या आज्जी आबांना पण पत्ते खेळायला आवडतं मग रात्री आम्ही सगळे  मिळून गड्डा झब्बू, बदाम सात , ३०४ , लॅडिज , चॅलेंज असे  पत्त्यातले बरेच प्रकार  खेळायचो. आमच्या आबांना chitting केलेली किंवा खाणाखुणा केलेल्या अजिबात चालत नसत त्यामुळे  आम्हालाहि तशीच सवय लागली. पुढे  कॉलेजमध्ये आल्यावर त्यामुळे माझी जाम पंचाईत व्हायची.

रात्री मग आई आणि आज्जीला चिकटून कोण झोपणार म्हणून वाद. शेवटी आज आपला नंबर लागल्यावर होणारा  आनंद ... आज्जी, आई, मावशी यांच्या  गप्पा मच्छरदाणीतून पडल्या पडल्या ऐकायला फार मजा  वाटायची. आमच्या कोल्हापूरकडे  सगळे  लोक गप्पिष्ट. मग आम्ही  मुलं  त्यांना  चिडवायचो - झाली  का  तुमची  कॅसेट  सुरु ? नंतर नंतर मग जशा CD, DVD  बाजारात आल्या तसं म्हणायला लागलो कि काय  सुरु  झाली  का DVD ? :)

जसं जसं लिहिते आहे तसं तसं इतकं काय काय आठवायला लागलं आहे.. वाटतं सगळ लिहून टाकावं. ते   दिवस  परत  यायचे  नाहीत  आता  म्हणून  खूप  वाईट  वाटत. आपल्या डोळ्यावर एक video रेकॉर्ड करता येईल अशी सोय पाहिजे होती. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते सगळ रेकॉर्ड करून परत परत पाहता आलं असतं. आता आपल्यातलाच बराचसा निरागसपणा आणि छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा आनंद हरवून  बसलोय आपण. तरी सुरुवातीपासूनच खूप साध्या वातावरणात रहायची सवय असल्यामुळे अजून आम्ही मुळांशी जोडलेलो आहोत. कसल्याही सुविधा नसल्या तरी आम्हाला कुठेही राहायला आवडत. माझ्या  नशिबाने मला भरपूर मजा करायला मिळाली माझ्या आजोळी. हल्ली कॉम्पुटर, मोबाईलवर खेळणारी मुलं   पाहिली कि मला त्यांची दया येते,  ह्या असल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींनी अगदि जखडून टाकलंय त्यांना. त्यामुळे एकत्र राहण्यातली मजा किंवा काही वाटून मिळतो तो आनंद, भावंडांतलं प्रेम त्यांना  कळतच नाही.

आमच्या  लहानपणी  आम्ही  दिवाळी  आणि  मे  महिन्याच्या  सुट्टी  ची  अगदी  चातकाप्रमाणे  वात  पाहायचो. कधी एकदा सुट्टी लागते आणि सगळे बहिणभाऊ एकत्र जमून घर हादरून टाकतो अस व्हायचं.
आता वाटत लहान होतो तेच बर होत. तुकारामानी  म्हटलंयच  नाहीतरी लहानपण  देगा  देवा, मुंगी साखरेचा  रवा ..........

1 comment:

  1. एकदम झकास! मस्त लिहिलंयस. एकदम निपाणीतले दिवस आठवले.
    आपल्या काही आठवणी सारख्याच आहेत पण माझ्या अश्या काही खास आठवणीही आहेत निपाणीच्या वाड्यातल्या. क्षणभर परत तिथे गेल्यासारखं वाटलं. :)
    Good write up. Keep it up!

    ReplyDelete